फोटो सौजन्य सोशल मीडिया
यंदाच्या ७०व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमीवर देशभरातून लाखो बौद्ध अनुयायी येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका, जिल्हा प्रशासन आणि समाजकल्याण विभागाने तयारीला वेग दिला आहे. मनपा आयुक्त डॉ. विपीन इटनकर यांनी मंगळवारी आढावा बैठक घेत विविध विभागांना समन्वयाने काम करण्याचे निर्देश दिले. १८ ते २२ ऑक्टोबरदरम्यान अनुयायांना आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
Nagpur Crime : चिमुकलीवरील गैरप्रकाराच्या आरोपाने शिवनगर हादरले; जमावाच्या मारहाणीत इसमाचा मृत्यू
दीक्षाभूमी परिसराभोवती २४ तास सीसीटीव्हीच्या माध्यमातून निगराणी ठेवण्यात येणार आहे. गर्दीचे व्यवस्थापन, सुरक्षितता आणि आपत्कालीन परिस्थितीसाठी मनपाकडून नियंत्रण कक्ष उभारला जाणार आहे. परिसरात स्वच्छता राखण्यासाठी विशेष कर्मचारी तैनात केले जातील. वीजपुरवठा, पिण्याचे पाणी, शौचालये आणि वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
दीक्षाभूमी, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ परिसर, माता कचेरी आणि कुर्वेज शाळा परिसरात अनुयायांसाठी मोठे डोम उभारण्यात येणार आहेत. बेझनबाग आणि उंटखाना मैदानावर निवास व शौचालयांची व्यवस्था केली जाणार आहे. तसेच विविध ठिकाणी तात्पुरती आरोग्य केंद्रे उभारून अनुयायांना वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
अंबाझरी तलावात अनुयायांच्या स्नानाच्या वेळी सुरक्षितता राखण्यासाठी अग्निशमन दल आणि बोटी तैनात केल्या जातील. नागरिकांना तलावाच्या पाण्यात उतरण्यापासून रोखण्यासाठी आणि सोयीसाठी, तलावाजवळ तात्पुरती शौचालये (कपडे बदलण्याची खोली/शौचालये) बांधली जातील.






