
शेतकऱ्यांवर तिहेरी संकट! उत्पादन खर्च वाढला, भाजीपाल्याचे दर घसरले अन् पावसानेही दडी मारली
पिकांना पाणी देण्यासाठी वीज, इंधन, मजुरीचा खर्च वाढत असतानाच बाजारात मालाला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले आहे. सुरुवातीला झालेल्या पावसावर सोयाबीन, मका व खरीप हंगामातील पिकांची पेरणी केली. पाण्याची उपलब्धता मर्यादित असल्याने अनेकांनी टोमॅटो, भेंडी, वांगे, कोथिंबीर, मेथी यांसारख्या भाजीपाला पिकांना पसंती दिली. मात्र, त्यानंतर पावसाने दडी मारल्याने विहिरी, बोअरवेल आणि इतर जलस्त्रोतांवरील ताण वाढत चालला आहे. पिकांना आवश्यक त्या प्रमाणात पाणी देणे कठीण होत असून शेतकऱ्यांची चिंता दिवसेंदिवस वाढत आहे. पाणी उपलब्ध ठेवण्यासाठी वीज, इंधन, मजुरी आणि सिंचनावर मोठा खर्च करावा लागत आहे. त्यातच शेती साहित्याचे वाढल्याने खर्चात वाढ झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
सध्या टोमॅटो कवडीमोल भावाने विकला जात आहे, भाव इतके घसरले की तोडणी, वर्गीकरण, वाहतूक आणि बाजारापर्यंत माल पोहोचविण्याचा खर्चही निघत नाही. त्यामुळे काही शेतकऱ्याऱ्यांनी टोमॅटोची तोडणी न करता पिकालाच सोडून दिले आहे. मेहनत आणि खर्च करून केलेले पीक आता शेतक-यांसाठी तोट्याचे ठरत आहे.
समाधानकारक पाऊस न झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती असल्याने शेतकरी वर्गावर दुहेरी नव्हे तर तिहेरी संकट उभे राहिले आहे. बाजारभावातील घसरण व पावसाची अनियमिततेमुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडल्ला आहे. समाधानकारक पाऊस न झाल्यास शेतकऱ्यांचे नुकसान वाढण्याची तसेच शेतकऱ्यांच्या आर्थिक संकटात आणखी भर पडण्याची शक्यता आहे.
पाण्याची कमी असून मोठा खर्च करून टोमॅटो लागवड केली. मात्र, दर एवढे घसरले की मार्केटला ते कुणी घ्यायला तयार नाही. तोडणीचा खर्चही निघत नसून पीक जागेवर सोडले- सुकदेव मॅगाने, टोमॅटो उत्पादक शेतकरी, पाटोदा
मी सुमारे दोन लाख रुपये खर्च करून कोबी पिकाची लागवड केली. दर कोसळल्याने केलेला खर्च न निघाल्याने मोठा
आर्थिक तोटा झाला.- सोमनाथ शेळके, कोबी उत्पादक शेतकरी ठाणगाव
टोमॅटोसोबतच कोथिंबीर, मेथी, पालक, भेडी आणि वांगी या भाजीपाल्यांचे दर घसरले आहेत. कोथिंबीरला बाजारभाव मिळत नसल्याने काही शेतकऱ्यांना पीकावर रोटर फिरविला. पावसाने पाठ फिरवल्याने अनेक ठिकाणी पाण्याची कमतरता जाणवत असून पुरेसे पाणी न मिळाल्याने मका सोयाबीन पिकावर ताण दिसून येत असल्याने उत्पादन घटणार असल्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहे पिकांची वाढ खुंटण्याने उत्पादनात घट होण्याची चिन्हे दिसत आहे.