सोशल मिडीया - सौजन्य फोटो
देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात बहुराष्ट्रीय कंपनीतील एका तरुणीच्या तक्रारीवरून दानिश शेख, तौसिफ अत्तार, निदा खान, छत्रपती संभाजीनगरमधील एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल आणि घरमालक हानिफ शेख यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच मुंबई नाका पोलीस ठाण्यात याच कंपनीतील एका तरुणाच्या तक्रारीवरून तौसिफ अत्तार, दानिश शेख, शाहरुख कुरेशी, रझा मेमन यांच्यासह निदा खान हिच्याविरोधातही गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या दोन्ही प्रकरणांमध्ये नाशिकरोड आणि नाशिक जिल्हा न्यायालयाने निदाला सशर्त जामीन मंजूर केला आहे.
२६ मार्चपासून या प्रकरणांमध्ये नाव आल्यानंतर पोलीस तपास आणि न्यायालयीन प्रक्रियेमुळे निदाच्या वैवाहिक आयुष्यात तणाव निर्माण झाल्याची माहिती आहे. तिचे लग्न दोन ते तीन वर्षांपूर्वी झाले होते. या प्रकरणामुळे झालेली बदनामी आणि सामाजिक दबाव यामुळे तिच्या पतीने घटस्फोटाचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. आठ महिन्यांचे गर्भारपण, सुरू असलेली कायदेशीर लढाई आणि आता पतीकडून दाखल करण्यात आलेला घटस्फोटाचा अर्ज, अशा परिस्थितीत निदासमोर नवे आव्हान उभे राहिले आहे.
यापूर्वी निदाच्या जामीन अर्जावर सुनावणी करताना न्यायालयाने बाळाच्या हिताचा आणि मानवी हक्कांचा विचार केला होता. नवजात बाळाला तुरुंगातील वातावरणाचा सामना करावा लागू नये, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले होते. यावेळी न्यायालयाने भगवान श्रीकृष्णाच्या जन्माचा संदर्भ देत बाळाच्या हिताचे महत्त्व अधोरेखित केले होते. निदाला जामीन मिळाल्यानंतर आता तिच्या पतीने घटस्फोटासाठी न्यायालयात अर्ज केल्याने या प्रकरणाला वैयक्तिक आयुष्यातील नवे वळण मिळाले आहे. १६ ऑक्टोबरच्या सुनावणीत पुढे काय घडते, याकडे लक्ष लागले आहे.






