फोटो सौजन्य: गुगल
नवी मुंबई/ सिद्धेश प्रधान : नवी मुंबई महापालिकेने दिघा परिसरात नालेसफाईचे कंत्राट काढले आहे. हे पावसाळापूर्व असले तरी पावसाळा संपताना ते काढण्यात आल्याने संशयाला जागा निर्माण झाली आहे. निविदेत अनावश्यक फुगीरता आणल्याचे दिसत आहे. या नालेसफाईसाठी दोन टप्प्यात कामे केली जाणार आहेत. जवळपास एक कोटी २२ लाखांची ही नालेसफाई आहे.सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात या कामाची वर्क ऑर्डर कंत्राटदाराला मिळणार आहे. हे काम पुढील ९ महिने चालणार असल्याने २०२६ सालातील पावसाळापूर्व निविदा प्रक्रिया आहे आहे का ? असा ही प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत.
पहिल्या निविदेत १ हजार ९२० कामगार असणार असून,त्यासाठी कंत्राटदाराला १० लाख रुपये देण्यात येणार आहेत. यासोबत १५० तास जेसीबी चालविण्यासाठी प्रति तास १ हजार ०७७ रुपये असे एकूण १ लाख ६१ हजार ६९५ रुपये कंत्राटदाराला मिळणार आहेत. ७० ट्रक गाळ उचलून डंपिंग ग्राउंडवर पोहोचवणार आहेत. त्यासाठी २ हजार ७४८ रुपये प्रति ट्रक असे १ लाख ९२ हजार रुपये पालिका कंत्राटदाराला मिळणार आहेत. एकूण ९ हजार ३१४.५२ क्युबिक मीटर गाळ, कचरा काढला जाणार आहे. जेसीबी, कामगारांव्यतिरिक्त यंत्रणा राबविण्यासाठी ४१ लाख ६६ हजार रुपये कंत्राटदाराला मिळणार आहेत तर पंपाद्वारे पाणी काढण्यासाठी पालिका ३७ हजार ४१६ रुपये खर्च करणार आहे. गाळाची व्हिलेवाट लावण्यासाठी २० लाख ९५ हजार ७६७ रुपये पालिका खर्च करणार आहे.
जर जेसिबीतून वेगाने व मोठ्या संख्येने गाळ काढणार असल्याने, हाताने काम करणाऱ्या इतक्या कामगारांची गरज पालिकेला का पडावी? त्यामुळे कामगारांची मोठी संख्या देखावून त्या आडून मलिदा लाटण्याची शक्यता आहे.अडीच महिने पाऊस पडल्यावर पालिकेने ९ हजार ३१४ क्युबिक मीटर गाळ कसा ठरवला. पावसाळा असल्याने गाळ काढून तो कसा सुकणार? गाळ काढून तो थेट ट्रकमधून डम्पिंग ग्राऊंडवर न्यावा लागणार आहे. ट्रकमध्ये गाळ टाकण्याचे काम जेसीबी करणार असल्याने इतक्या मोठ्या संख्येने कामगार तिथे काय करणार आहेत ? पावसाळ्यात नाल्यातून अथवा गाळातून पंपाद्वारे पाणी काढणार कसे ? असे असताना पाणी काढण्यासाठी पंपासाठी ३७ हजार रुपये खर्च कशासाठी केला जात आहे?
थेट जेसीबी नाल्यात उतरवून त्यातून कचरा गोळा केला जाणार आहे. त्यामुळे जेसीबी व कामगारांव्यतिरिक्त व्यतिरिक्त अशा कोणत्या यंत्रणा आहेत ज्यातून कचरा काढला जाणार आहे ? त्या खरोखर वापरण्यात येणार आहात का? त्यासाठी ४२ लाख रुपये खर्च दाखवून निविदा फुगवली गेली आहे का?
गाळ काढून त्याची वाहतूक करण्यासाठी ७० ट्रक पालिकेने डंपिंग ग्राउंडवर गाळ वाहून नेण्यासाठी व टाकण्यासाठी ठरवले आहेत. त्यानुसार डंपिंग ग्राउंडवर गाळ रिता केला जाणार आहे ? त्यासाठी पालिका लाखो रुपये खर्च करत आहे. मग कंत्राटदाराला पुन्हा विल्हेवाट लावण्यासाठी २० लाख रुपये का देण्यात येणार आहेत?
एकीकडे ९ हजार ३१४ क्युबिक मीटर गाळ उचलण्यासाठी पालिकेने पहिल्या निविदेत १ हजार ९२० कामगार संख्या दाखवली आहे. दुसऱ्या निविदेत ४ हजार ८७३ क्युबिक मीटर गाळ दाखवून कामगारांची संख्या कमी होणे गरजेचे होते. असे असताना कामगारांची संख्या पहिल्या निविदे इतकीच १ हजार ९२० ठेवण्यात आल्याने कामगारांच्या संख्येत संशय निर्माण होत आहे. पहिल्या निविदेत गाळ जास्त असताना नाल्यातून पंपाने पाणी काढण्यासाठी ३७ हजार रुपये मोजले जाणार आहेत. तिथे दुसऱ्या निविदेत गाळ पहिल्या निविदेपेक्षा निम्म्यावर असताना पंपाने पाणी काढण्यासाठी तब्बल ६५ हजार रुपये पालिका खर्च करणार आहे. याही निविदेत विल्हेवाट लावण्यासाठी पुन्हा कंत्राटदाराला पालिका जवळपास ११ लाख रुपये देणार आहे.
एकूणच या निविदा प्रक्रियेतील अनेक बाबींवर संशय निर्माण होत आहे. याआधी घनकचरा विभागाकडे नाले सफाईची कामे होती. मात्र या वर्षापासून अभियंता विभागाकडे ही कामे सोपविली गेली आहेत. त्यामुळे पावसाळा शेवटच्या टप्प्यात पोहोचून देखील एकूणच नाले सफाईच्या निविदा फुगताना दिसून येऊ लागल्या आहेत. जिथे १० ते १५ लाखांमध्ये नाले सफाई केली जात होती. तिथेआता थेट कोट्यावधींची उड्डाणे नाले सफाई घेऊ लागली आहे. त्यामुळे ही निविदा प्रक्रिया रद्द करावी अन्यथा आम्ही थेट मुख्यमंत्र्यांकडे, उपमुख्यमंत्र्यांकडे तक्रार करू, असं समता समाज संघटनेचे कामगार नेते मंगेश लाड यांनी सांगितलं आहे.