किती तो राग ! चारित्र्यावर संशय अन् नवऱ्याने आपल्या मुलासमोरच बायकोला...
सावन वैश्य | नवी मुंबई :- सुखी संसारात एकदा का संशयाची जळती ठिणगी पडली, की ते नातं भंग पावते. कोपरखैरणे येथे घडलेली दुर्दैवी घटना याचेच जिवंत उदाहरण ठरली आहे. पतीने पत्नीवर संशय घेतला आणि रागाच्या भरात तिला मुलासमोरच ठार मारल्याची घटना निदर्शनास आली आहे. घरगुती वादातून वाढलेल्या संशयामुळे पतीने टोकाचा निर्णय घेतला. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, पुढील तपास सुरू आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. एकत्र संसार करणाऱ्या जोडप्यांमध्ये विश्वास महत्त्वाचा असतो, मात्र संशय आल्यास तो नातं तोडू शकतो हे यावरून स्पष्ट होते. चला या घटनेबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
कोपरखैरणे सेक्टर 19 मधील जय भवानी अपार्टमेंटमध्ये घडलेली पती-पत्नीमधील कौटुंबिक हिंसाचाराची घटना संपूर्ण परिसर हादरवून सोडणारी ठरली आहे. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीने चिमुकल्या मुलांपुढे तिच्यावर चाकूने सपासप वार करत निर्घृण हत्या केली आहे. त्यानंतर स्वतःच्याही हाताची नस कापून त्याने आत्महत्येचा प्रयत्न देखील केला.
आरोपीचे नाव गणेश मारुती शिरसाट ( ३८ ) असून मयत पत्नीचे नाव गौरी गणेश शिरसाट ( ३४) असे आहे. ही घटना बुधवारी (११) घडली असून, जेव्हा गौरी घरात होती, तेव्हा अचानक पतीने संशयाच्या भरात तिच्यावर चाकूने तब्बल १० ते १५ वार केले. इतकंच नाही, तर तिचं डोकं भिंतीवर आपटत तीला जागीच ठार केलं.
संपूर्ण प्रकार घरात त्यांच्या दोन मुलांपुढे घडला. त्यातील मोठा मुलगा (वय १०) हा मतिमंद आहे आणि लहान मुलगा केवळ ६ वर्षांचा आहे. त्यामुळे ही घटना केवळ हिंसकच नाही, तर मन हेलावून टाकणारी आहे.
हत्या केल्यानंतर आरोपी गणेश शिरसाट याने स्वतःच्या हाताच्या नसाही कापल्या व आत्महत्येचा प्रयत्न केला. गंभीर अवस्थेत त्याला उपचारासाठी मुंबईतील जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, तो सध्या पोलिस निगराणीत आहे.
शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार हे दांपत्य चार महिन्यापूर्वीच नव्या घरात राहायला आलो होतो. गौरी शिरसाट या पेशाने नर्स होत्या. तर गणेश शिरसाट बेरोजगार असून, गेल्या काही महिन्यांपासून दोघांमध्ये चारित्र्यावरून वाद सुरू होते, अशी माहिती शेजाऱ्यांकडून मिळाली आहे.
खारघरमध्ये नुकतीच घडलेली दुहेरी हत्येची घटना ताजी असतानाच कोपरखैरणेतील ही घटना समोर आल्याने नवी मुंबईत एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी कोपरखैरणे पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.