(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
मराठी चित्रपटसृष्टीत तांत्रिक प्रयोगांची नवी मर्यादा गाठणारा ‘गोंधळ’ हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित झाला असून प्रेक्षक आणि समीक्षकांकडून या चित्रपटाला प्रचंड उत्साहात प्रतिसाद मिळत आहे. वर्ड ऑफ माऊथने हा चित्रपट अधिक लोकांपर्यंत पोहोचत असून अनेक ठिकाणी या चित्रपटाचे शोजही वाढवण्यात आले आहेत. दमदार कथानक, भव्य स्केल आणि उत्कट अभिनयाच्या बळावर हा चित्रपट आधीच चर्चेत होता, मात्र आता या चित्रपटाचे आणखी एक भव्य वैशिष्ट्य समोर आले आहे. ‘गोंधळ’च्या पहिल्या हाफमध्ये तब्बल २५ मिनिटांचा वनटेक सीन घेण्यात आला असून हे भारतीय चित्रपटसृष्टीत पहिल्यांदाच घडले आहे.
हा रेकॉर्ड साध्य करण्यासाठी संपूर्ण टीमने सात दिवसांत हा भव्य टेक परिपूर्ण केला आहे. भारतीय चित्रपटांमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात, इतक्या अचूक प्लॅनिंगने झालेला वनटेक हा पहिला प्रयोग ठरला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरही वन-टेक शैलीला विशेष मान्यता मिळालेली आहे. २०१४ मधील’बर्डमॅन’ आणि २०१९ मधील ‘१९१७’ या चित्रपटांनी याच शैलीचा प्रभावी वापर करून ऑस्कर जिंकला असून ‘गोंधळ’चा हा प्रयोग त्याच दर्जाच्या धाडसाच्या पावलावर पाऊल टाकणारा आहे.
मोठी बातमी! बिग बॉस फेम शिव ठाकरेच्या घराला भीषण आग, Video व्हायरल
‘गोंधळ’ हा चित्रपट महाराष्ट्राची परंपरा, मानवी भावभावनांच्या गुंतागुंतीवर, नात्यांच्या ताणतणावांवर आणि परिस्थितींच्या रोलर-कोस्टरवर आधारित चित्रपट आहे. नाट्य आणि थराराचा अनोखा संगम, शक्तिशाली पात्रं आणि त्यांच्या मनातील असंख्य परताव्यांना पडद्यावर उतरवणारी ही कथा प्रेक्षकांना सुरुवातीपासून शेवटपर्यंत खिळवून ठेवणारी आहे.
या अनुभवाबद्दल सांगताना दिग्दर्शक संतोष डावखर म्हणाले, ”तांत्रिक टीमसह या चित्रपटाशी जोडले गेलेल्या सगळ्यांच्याच अथक प्रयत्नामुळे हे शक्य झालं आहे. रात्री चित्रीकरण सुरू करून तब्बल सात दिवसांत हा वनटेक सीन पूर्ण झाला. प्रत्येक वायर, प्रत्येक फोकस, प्रत्येक कलर तापमानावर आमची कसोटी होती. दररोज ३०० पेक्षा अधिक जुनिअर्स, पाऊण किलोमीटरपेक्षा जास्त लाइटिंग सेटअप, पाच जनरेटर आणि पेट्रोलचे तीन टँकर यासाठी लागले. हा आमच्यासाठीही एक ऐतिहासिक क्षण आहे. इतका मोठा सीन एकाच टेकमध्ये सुरळीत चालणं म्हणजे जादूच होती.”
वनटेक हा प्रकार लहान-मोठ्या सीनमध्ये अनेक चित्रपटांनी आजवर वापरला असला, तरी २५ मिनिटांचा अखंड, अविरत वनटेक भारतात पहिल्यांदाच ‘गोंधळ’च्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. मराठी चित्रपटाने केलेला हा प्रयोग केवळ तांत्रिक विजय नाही तर प्रेक्षकांना दिलेला अनोखा अनुभवही आहे. ‘गोंधळ’ची कथा, पटकथा आणि संवाद स्वतः संतोष डावखर यांनी लिहिले असून डावखर फिल्म्स निर्मित या चित्रपटाच्या सहनिर्मात्या दीक्षा डावखर आहेत. संतोष डावखर दिग्दर्शित या चित्रपटात किशोर कदम, इशिता देशमुख, योगेश सोहोनी, निषाद भोईर, अनुज प्रभू, सुरेश विश्वकर्मा, माधवी जुवेकर, ऐश्वर्या शिंदे, कैलाश वाघमारे, प्रभाकर मठपती, विठ्ठल काळे, प्रवीण डाळींबकर, शरद जाधव, पूनम पाटील आणि ध्रुव ठोके हे नामवंत कलाकार प्रमुख भूमिकेत झळकले आहेत.






