राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मुंबई विभागाचे अध्यक्ष समीर भुजबळ यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
राज्यात विधानसभा निवडणुकीआधी महायुतीत मोठी बंडखोरी पहायला मिळाली आहे. छगन भुजबळ यांचे पुतणे आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मुंबई विभागाचे अध्यक्ष समीर भुजबळ यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी नांदगाव विधानसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून उमेदवारी अर्जही दाखल केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी आणि महायुतीसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. महायुतीतील जागावाटपात नांदगावची जागा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे गेली आहे, शिंदे यांनी विद्यमान आमदार सुहास कांदे यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
समीर भुजबळ नांदगाव विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक होते. त्यांनी पक्षाकडे तिकीट देण्याचीही मागणी केली होती. मात्र जागावाटपात ही जागा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला जाईल अशी चर्चा होती. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते नाराज होते. तर शिवसेनेतून सुहास कांदे यांना उमदेवारी देणार असल्याची चर्चा होती. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त करत त्यांना समर्थन देणार नसल्याचा इशारा दिला होता. पण अखेर जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यात ही जागा एकनाथ शिंदेच्या खात्यात गेली आणि सुहास कांदे यांच्या उमदेवारीवर शिक्कामोर्तब झालं.
राष्ट्रवादी कॉंग्रेसने वर्षभरापूर्वी आपल्यावर विश्वास ठेवून पक्षाच्या मुंबई अध्यक्षपदाची जबाबदारी सुपूर्द केली होती. जबाबदारी पार पडत असताना प्रतिकूल परिस्थितीत संघटन मजबुतीने उभे केले. मात्र भुजबळ कुटुंबीयांचे ऋणानुबंध असलेल्या नांदगावमध्ये परिस्थिती अतिशय खूपच बिकट आहे. गेल्या पाच वर्षात या मतदारसंघातले वातावरण दूषित बनलं आहे. नांदगावमधील नागरिकांनी आपली भेट घेऊन याबाबत कैफियत मांडली होती. नागरिकांची मागणी आणि दहशतीचे वातावरण बदलण्यासाठी या मतदारसंघात विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. तरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा मुंबई अध्यक्षपदाचा मी राजीनामा देत आहे, असं समीर भुजबळ यांनी म्हटलं आहे.
यावेळी समीर भुजबळ यांनी सुहास कांदे यांच्यावरही टीका केली आहे. नांदगाव मतदारसंघाचा विकास खुंटला आहे. विद्यमान आमदार आल्यानंतरच अशी अवस्था आहे. तसंच मतदारसंघात अतिशय भयभीत वातावरण आहे. जागा शिवसेना शिंदे गटाकडे गेल्यामुळे दुसरा काहीतरी निर्णय घ्यावा अशी कार्यकर्त्यांची मागणी होती. त्यामुळं निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला.
समीर भुजबळ छगन भुजबळ यांचे पुतने आहेत आणि ऐन निवडणुकीच्या तोंडावर भुजबळांच्या घरातच बंडखोरी झाली आहे. पंकज भुजबळ विधान परिषदेवर आमदार झाले. त्यानंतर समीर भुजबळ यांना तिकिट मिळेल अशी चर्चा होती. मात्र तसं घडलं नाही. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतील सुहास कांदे यांना संधी मिळाली. त्यामुळे नाराज समीर भुजबळ यांनी अजित पवारांची साथ सोडत वेगळी चूल मांडली आहे.