सौजन्य - नवराष्ट्र टीम
माळेगाव : नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जाहीर झालेल्या अंतिम मतदारयादीत झालेल्या गंभीर गोंधळामुळे माळेगावात संतापाची लाट उसळली आहे. अनेक मतदारांची नावे चुकीच्या प्रभागात समाविष्ट झाल्याने नागरिक आणि इच्छुक उमेदवारांनी नगरपंचायत कार्यालयात धाव घेतली. यावेळी मुख्याधिकारी बालाजी लोंढे यांना जाब विचारत नागरिकांनी प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली.
शनिवारी सकाळपासून तब्बल साडेसहा तास तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. नागरिकांनी आपापल्या तक्रारींसह आंदोलनाची भूमिका घेतली होती. अखेर मुख्याधिकारी लोंढे यांनी हस्तक्षेप करून परिस्थिती शांत केली. त्यांनी दिलेल्या लेखी आश्वासनात नमूद केले की, “ज्यांच्या हरकती प्रलंबित आहेत, त्यांचा विशेष अहवाल नियमानुसार बारामती प्रांताधिकारी वैभव नावडकर यांच्याकडे दुरुस्तीसाठी पाठविला जाईल.”या लेखी आश्वासनानंतर नागरिकांचा संताप निवळला आणि परिस्थिती नियंत्रणात आली. नागरिक, पोलिस आणि प्रशासन या तिन्हींकडून सुटकेचा नि:श्वास टाकण्यात आला.
शाब्दिक वाद व अरेरावीची स्थिती निर्माण
दरम्यान, प्रशासन आणि ग्रामस्थांमध्ये शाब्दिक वाद व अरेरावीची स्थिती निर्माण झाली होती. संभाव्य वाद टाळण्यासाठी सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन लोखंडे यांनी तातडीने हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली. नगरपंचायत प्रशासनाने १७ प्रभागांची अंतिम मतदारयादी शुक्रवार (ता. ३१ ऑक्टोबर) रोजी प्रसिद्ध केली होती. त्याआधी प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार यादीवर तब्बल १,२९४ हरकती दाखल झाल्या होत्या. त्यापैकी २९४ हरकतींची सुनावणी प्रांताधिकारी वैभव नावडकर यांच्या उपस्थितीत ३० ऑक्टोबर रोजी झाली होती. तरीही अनेक तक्रारींवर तोडगा न निघाल्याने ग्रामस्थांचा संताप अधिकच वाढला.
प्रशासनाविषयी अविश्वासाचे वातावरण
यावेळी तक्रारदार नितीन तावरे, अविनाश तावरे, दादा जराड, निशिगंध तावरे, अविनाश भोसले, इम्तियाज शेख आदींनी मुख्याधिकारींना घेराव घालण्याचा प्रयत्न केला. तर प्रतिस्पर्धी गटातील दीपक तावरे, अॅड. राहुल तावरे, जयदीप तावरे यांनी प्रशासनाचा पाठिंबा दर्शवित, “प्रशासनावर दबाव टाकून निर्णय बदलविण्याचा प्रयत्न होऊ नये, सर्व कार्यवाही कायद्याच्या चौकटीत व्हावी,” अशी ठाम भूमिका मांडली. या सर्व घटनांमुळे गावात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले असले तरी मुख्याधिकारींच्या लेखी आश्वासनानंतर स्थिती शांत झाली. पोलिसांच्या तत्पर हस्तक्षेपामुळे संभाव्य मोठा वाद टळला, असे नागरिकांनी नमूद केले. दरम्यान, मतदारयादीतील या गोंधळामुळे नागरिकांमध्ये प्रशासनाविषयी अविश्वासाचे वातावरण निर्माण झाले असून, आगामी नगरपंचायत निवडणुकीपूर्वी पारदर्शक आणि अचूक कारवाई करण्याची मागणी सर्वसामान्य नागरिकांकडून होत आहे.






