सौजन्य - नवराष्ट्र टीम
बारामती/अमोल तोरणे : बारामती नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी राष्ट्रवादी कडून नगराध्यक्ष पदाचा संभाव्य उमेदवार कोण? याबाबत विविध तर्क वितर्क काढण्यात येत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना नगराध्यक्षपदाचा उमेदवार देताना कसब पणाला लागणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची याबाबत” वेट ॲन्ड वॉच” अशी भूमिका दिसून येत आहे. बारामतीचे नगराध्यक्षपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी जाहीर झाल्याने इच्छुकांची मोठी संख्या दिसून येत आहे.
बारामती नगरपालिकेमध्ये राष्ट्रवादीचे नेहमीच एकहाती वर्चस्व राहिले आहे. मात्र सध्या बारामती नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये दोन्ही राष्ट्रवादी आमने-सामने लढण्याची शक्यता आहे. अजित पवार गटाकडून संभाव्य नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांची नावे चर्चेत येऊ लागले आहेत. लोकसभा निवडणुकीतील बारामती शहरातील अनुभव लक्षात घेऊन अजित पवार यांना मोठी सावध भूमिका नगराध्यक्ष पदाचा उमेदवार देताना घ्यावी लागणार आहे.
विधानसभा निवडणुकीमध्ये बारामती शहरातील नागरिकांनी अजित पवार यांना एकहाती मतदान करून लोकसभेतील कसूर भरून काढली. त्यामुळे बारामती नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये उपमुख्यमंत्री पवार यांना चाणाक्ष पद्धतीने रणनीती अवलंबावी लागणार आहे. सध्या बारामती शहराची वाढलेली लोकसंख्या लक्षात घेता १८ ते २५ वर्ष वयोगटातील जो तरुण मतदार आहे, या मतदाराचा विचार देखील या निवडणुकीत करावा लागणार आहे. उपमुख्यमंत्री पवार यांच्या दृष्टीने बारामती शहरात कोट्यावधी रुपयांची झालेली विकास कामे, या माध्यमातून शहर परिसराचा बदललेला चेहरा, ही सर्वात मोठी जमेची बाजू आहे. मात्र नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारासाठी अन्य बाजू महत्वाच्या ठरणार आहेत. बारामती शहरामध्ये ओबीसी व मागासवर्गीय व अल्पसंख्यांक समाजाची लोकसंख्या सर्वात जास्त आहे, त्यामुळे या घटकांच्या सध्याच्या मानसिकतेचा देखील विचार करावा लागणार आहे.
बारामती नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदाच्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे संभाव्य उमेदवार म्हणून माजी ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर, बारामती सहकारी बँकेचे अध्यक्ष सचिन सातव, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष जय पाटील, माजी नगराध्यक्ष सुभाष सोमाणी, माजी नगरसेवक बबलू देशमुख यांची नावे प्रामुख्याने चर्चेत आहेत. यामध्ये किरण गुजर यांना नगर परिषदेमध्ये प्रदीर्घ अनुभव आहे, विविध राजकीय निवडणुकांची जबाबदारी त्यांच्यावर असते, त्यामुळे निवडणुक नियोजनाचा अनुभव व विविध घटकांची मोट बांधण्याचे त्यांचे कसब आहे. सचिन सातव यांच्या दृष्टीने बारामतीचे नगरसेवक म्हणून त्यांनी काम केले आहे, त्यांचे वडील सदाशिव सातव हे माजी नगराध्यक्ष होते, बारामती बँकेच्या अध्यक्षपदाची त्यांच्यावर सध्या जबाबदारी आहे, अनेक वर्षे त्यांनी नगरसेवक म्हणून काम केले आहे, त्याचबरोबर सचिन सातव यांच्या आई जयश्री सातव यादेखील बारामतीच्या नगराध्यक्ष होत्या.
राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष जय पाटील यांनी राष्ट्रवादीचे प्रभावीपणे काम केले आहे, त्यांच्याकडे संघटन कौशल्य चांगले आहे, नगरसेवक व उपनगराध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले आहे. शहरातील तांदुळवाडी भागामध्ये त्यांनी आपल्या संघटन कौशल्यावर ” पॉकेट वोट “तयार केला आहे. सुभाष सोमानी यांनी देखील नगराध्यक्ष म्हणून काम केले आहे, बबलू देशमुख यांचे युवक संघटन चांगले आहे. दिवंगत नगरसेवक कै. अशोककाका देशमुख यांचे ते चिरंजीव आहेत.
दरम्यान ऐनवेळी नगराध्यक्षपदाचा नवा चेहरा उपमुख्यमंत्री अजित पवार देतात काय? असा सवाल देखील उपस्थित केला जात आहे. मात्र नवीन चेहरा देत असताना किंवा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार देत असताना, जो नेहमी जनतेच्या कायम संपर्कात असतो, ज्याचे पक्षासाठी नेहमी योगदान आहे, ज्याचे तळागाळात काम आहे, अशा चेहऱ्यालाच उमेदवारी मिळावी, अशी कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे. दरम्यान शरद पवार गटाकडून युवा नेते युगेंद्र पवार हे बारामती नगरपरिषदेच्या निवडणुकीबाबत चाचणी घेत आहेत.






