फोटो सौजन्य - ट्विटर (एक्स)
बारामती : लोकसभा निवडणुकीनंतर तिसऱ्यांदा मोदी सरकार स्थापन झाले आहे. सरकार स्थापनेनंतर पहिलेच अधिवेशन येत्या 24 जून रोजी होणार आहे. त्यामुळे सत्तेतील पक्षांसह विरोधात नेते देखील कामाला लागले आहे. नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या टर्ममध्ये अध्यक्ष, उपाध्यक्ष व विरोधीपक्षनेता कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते शरद पवार यांनी केंद्रातील विरोधीपक्षपदाबाबत सूचक विधान केले आहे,
दौऱ्यामध्ये लोकांची सुख दुःख जाणून घेण्याचा प्रयत्न
शरद पवार हे सध्या बारामती दौऱ्यावर आहेत. सुप्रिया सुळे यांनी बारामतीचा गड राखल्यानंतर शरद पवार यांचा पहिल्याच दौरा आहे. यावेळी त्यांनी अनेक गावांना भेटी देत निवडणुकीतील मतदानाचा आढावा घेतला आहे. या बारामती दौऱ्यावेळी माध्यमांशी शरद पवार यांनी संवाद साधला. यावेळी पवार म्हणाले, “दौऱ्यावेळी बऱ्याच गोष्टी लोकांनी सांगितल्या आहेत. पुढील गोष्टी पुण्यात आणि मुंबईत मिटिंग घेऊन सोडविण्याचा प्रयत्न केला जाईल. मुख्यमंत्र्यांना देखील एक पत्र पाठवले आहे. जानाई, शिरसाई व पुरंदर उपसा यासंदर्भात दुरुस्ती ,बिले भरणे अशा काही समस्या आहेत त्यासंदर्भात राज्यसरकारने ही बैठक घ्यावी आणि समस्या संदर्भात मार्ग लावावा. लोकांचा जोडधंदा म्हणून दुधधंदा म्हणून करतात. सरकारनं 5 रुपये अनुदान जाहीर केलं परंतू अनुदान मिळालं नाही. यासंदर्भात लोकांच्या मागण्या पूर्ण होण्यासाठी काम करणार आहे. या सर्व दौऱ्यामध्ये लोकांची सुख दुःख जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. उद्या अधिकारी यांच्याशी चर्चा करणार आहे,” असे मत शरद पवार यांनी व्यक्त केले.
काँग्रेसला जास्त जागा असल्याने विरोधीपक्षनेता पद त्यांच्याकडे
पुढे त्यांनी केंद्रीय विरोधीपक्षनेत्या बाबत आपले मत व्यक्त केले. शरद पवार म्हणाले, “येत्या 26 जून व 27 जून या दोन दिवशी इंडिया आघाडी बैठक पार पडणार आहे. यावेळी अनेक बाबींवर चर्चा होणार आहे. तसेच विरोधीपक्षनेत्याबाबत देखील चर्चा होईल. इंडिया आघाडीमध्ये चर्चा करुन निर्णय घेतला जाईल. काँग्रेसकडे सर्वात जागा असल्याने पद त्यांच्याकडे जाईल. मात्र सर्व पक्षांच्या सर्वोतोपरी बैठक घेऊन निर्णय घेतला जाईल,”असे स्पष्ट मत शरद पवार यांनी मांडले आहे. इंडिया आघाडीमध्ये काँग्रेसला जास्त जागा असल्याने विरोधीपक्षनेता पद त्यांच्याकडे जाण्याची शक्यता आहे. तर काँग्रेस पदाधिकाऱ्यांची राहुल गांधी यांनी जबाबदारी स्वीकारावी अशी इच्छा आहे. त्यामुळे लोकसभेमध्ये नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी खडाजंगी पाहता येणार असल्याची चर्चा रंगली आहे.