पुणे : राज्यामध्ये सर्वत्र आषाढी वारीचा उत्साह दिसून येत आहे. आळंदी येथून संत ज्ञानेश्वर महाराज व देहू येथून संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे प्रस्थान झाले आहे. आज दोन्ही पालख्या पुण्यामध्ये दाखल होणार आहेत. दरम्यान, मागील काही दिवसांपूर्वी शरद पवार पाटील वारी करणार असल्याचे बोलले जात होते. यंदाच्या वारीमध्ये शरद पवार वारकऱ्यांमध्ये पायी वारी करणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र या सर्व प्रकरणावर शरद पवार यांनी स्वतः प्रतिक्रिया दिली आहे. पुण्यामध्ये त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी वारीच्या सहभागाबद्दल उत्तर दिले. तसेच भारतीय क्रिकेट संघाचे देखील विश्वविजेता झाल्याबद्दल कौतुक केले.
येत्या 7 जुलै रोजी जेष्ठ नेते शरद पवार वारीमध्ये पायी सहभागी होत पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होणार असल्याच्या चर्चा होत्या. त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये एकच जल्लोष होता. मात्र कार्यकर्त्यांसाठी निराशा देणारी माहिती समोर येत आहे. माध्यमांशी संवाद साधताना शरद पवार याबाबत स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले, ‘मी बारामती ते इंदापूरमधल्या सणसरपर्यंत पायी चालणार ही बातमी खोटी आहे. पंढरपूरला जाणारी वारी माझ्या गावावरून जाते. त्या ठिकाणी एक दिवस मी थांबणार आहे. पालखीच्या स्वागतासाठी मी तिथे थांबणार आहे. मात्र मी पालखीसोबत चालणार नाही तर तिच्या स्वागतसाठी तिथे जाणार आहे,” अशी स्पष्ट भूमिका शरद पवार यांनी मांडली.
भारतीय संघाचे कौतुक
शरद पवार यांनी भारतीय क्रिकेट संघाचे देखील कौतुक केले. शरद पवार म्हणाले, “एकेकाळी जगाच्या क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका त्यांचं वेगळं स्थान होतं. अलीकडे भारतीय संघाने आपले वेगळे स्थान निर्माण केलं. टी ट्वेंटी विश्वचषक जिंकण्यासाठी भारताला अधिक वेळ लागला. भारतीय टीमने अद्भुत प्रकारचा चमत्कार केला. सुरुवातीला धावसंख्या पाहिल्यानंतर चिंता वाटावे अशी स्थिती होती. जसप्रीत बुमरा आणि कुलदीप यादव चांगली कामगिरी केली. द्रविडने खेळाडूंना योग्य प्रकारचे मार्गदर्शन केले. भारतीय संघाचे मनःपूर्वक अभिनंदन करतो,” अशा भावना शऱद पवार यांनी व्यक्त केल्या.