Photo Credit : Social media
नागपूर : येत्या काही दिवसांत राज्यात विधानसभा निवडणुका घेतल्या जाणार आहेत. त्यानुसार, सर्व पक्षांकडून जोरदार तयारीही केली जात आहे. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस व ओबीसी विभागाचे राज्य समन्वयक ईश्वर बाळबुधे यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी सक्रीय सदस्यत्वाचाही राजीनामा दिल्याने ऐन विधानसभा निवडणुकीपूर्वीच अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठे खिंडार पडल्याची चर्चा रंगली आहे.
अजित पवार यांनी नागपुरात आल्यावर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची नुकतीच बैठक घेतली होती. त्यात त्यांनी संघटन मजबूत करण्याचे आवाहन केले. या बैठकीला आठवडा लोटत नाही, तोच आता पदाधिकाऱ्याने राजीनामा दिला आहे. ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’च्या निमित्ताने अजित पवार नुकतेच नागपुरात येऊन गेले होते. राष्ट्रवादीची जनसन्मान यात्रा काढून वातावरण निर्मितीचाही प्रयत्न करण्यात आला. त्यानंतर पक्षात चैतन्य निर्माण झाल्याचे दाखविण्यात आले. परंतु, हा चैतन्यांचा फुगा पाचच दिवसांत फुटला.
ईश्वर बाळबुधे यांनी पक्षाचे पद अन् सक्रिय सदस्यत्वाचा प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडे राजीनामा पाठवला. त्यामुळे ते वेगळी वाट धरण्याचे संकेत दिले. राजीनाम्यात त्यांनी कारण स्पष्ट केले नाही. मात्र, सद्यस्थितीत अजित पवार गटातील अनेक नेते शरद पवार गटाकडे जात आहे. एवढेच नव्हे भाजप नेतेही शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या गळाला लागत आहे. ही स्थिती बघता बाळबुधेही शरद पवार यांच्याकडे परत जातील, अशी चर्चा रंगली आहे. त्यांच्या राजीनाम्याने विदर्भात अजित पवार यांच्या गटाला मोठा धक्का बसला आहे.
ईश्वर बाळबुधे यांचे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनेक वर्षे काम
ईश्वर बाळबुधे हे एकीकृत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनेक वर्षे काम करत होते. पक्षाचा गैरमराठा चेहरा म्हणून त्यांची ओळख होती. छगन भुजबळ यांचे ते कट्टर समर्थक मानले जातात. पक्षात फूट पडल्यावर छगन भुजबळ यांनी अजित पवार यांची साथ दिल्याने बाळबुधे हे सुद्धा अजित पवार गटाकडे गेले. पक्षाने त्यांची प्रदेश सरचिटणीसपदी व ओबीसी विभागाच्या राज्य समन्वयकपदी नियुक्ती केली होती. त्यांनी पक्षाचे कामही सुरू केले होते. मात्र, मागील काही दिवसांपासून ते नाराज असल्याचे समजते.