पुणे : राष्ट्रवादी पक्षाचे दोन गट पडल्यानंतर दोन्ही गटांनी वर्धापन दिन साजरा केला. शरद पवार गटाने अहमदनगरमध्ये वर्धापन दिन साजरा केला. यावेळी पक्षश्रेष्ठींनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला. लोकसभा निवडणुकीमध्ये शरद पवार गटाने महाराष्ट्र दौरा करत राज्यभरामध्ये उल्लेखनीय काम केले. त्यांसोबत बारामती गड राखण्यामध्ये देखील सुप्रिया सुळे यांना यश आले. यामुळे अजित पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. आगामी विधानसभा निवडणूकीपूर्वी कार्यकर्त्यांनी शरद पवार यांच्याकडे महत्त्वपूर्ण मागणी केली आहे. बारामतीचा दादा बदल्याचा आहे असे कार्यकर्त्यांनी शरद पवार यांना सांगितले आहे. त्यामुळे यापुढे कोणत्या पवार कुटुंबातील व्यक्तीला संधी दिली जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
बारामतीचा दादा बदलायचा आहे.
अजित पवार यांच्या अडचणींमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. बारामतीच्या लोकसभा निवडणुकीमध्ये अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा पराभव झाला. राज्यामध्ये केवळ 1 जागा अजित पवार गटाला मिळवण्यात यश आले. त्यानंतर केंद्रीय मंत्रीमंडळामध्ये अजित पवार गटाला एकही मंत्रीपद देण्यात आलेले नाही. राज्यमंत्री देण्यात येत होते मात्र ते अजित पवार गटाला मान्य नव्हते. त्यामुळे शपथविधीसोहळ्यामध्ये अजित पवार गटाच्या कोणत्याच खासदाराने शपथ घेतली नाही. यानंतर आता विधानसभेमध्ये देखील अजित पवार यांची कोंडी होण्याची शक्यता आहे. लोकसभेला सुनेत्रा पवार पडल्या तर मी विधानसभा लढणार नाही, असा शब्द अजित पवार यांनी दिल्याचा दावा काहींनी केला आहे. त्यामुळे आम्हाला बारामतीचा दादा बदलायचा आहे, अशी मागणी शरद पवार गटाच्या समर्थकांकडून केली जात आहे.
पुन्हा पवार विरुद्ध पवार
अजित पवार हे सध्या बारामतीचे आमदार आहेत. राज्याची विधानसभा निवडणुक येत्या 6 महिन्यांमध्ये होण्याचे संकेत आहेत. त्यामुळे शरद पवार गटाची मोटबांधणी सुरु झाली आहे. आता बारामती विधानसभेसाठी युगेंद्र पवार यांच्या नावाची चर्चा रंगली आहे. कार्यकर्त्यांकडून युगेंद्र पवार यांना बारामती विधानसभा मतदार संघातून उमेदवारी द्या, अशी मागणी करण्यात आली होती. युगेंद्र पवार यांना बारामतीमधून उमेदवारी द्या या मागणीसाठी बारामती शहर आणि तालुक्यातील कार्यकर्ते शरद पवार यांना भेटण्यासाठी गोविंद बागेत आले होते. विधानसभेसाठी आता बारामती मतदारसंघासाठी शरद पवार गटाकडून कोणाला उमेदवारी दिली जाणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. त्यांच्या विरोधामध्ये अजित पवार देखील निवडणुक लढवली तर पुन्हा एकदा पवार विरुद्ध पवार अशी लढत होण्याची शक्यता आहे.