नवी मुंबई : नेरुळ मध्ये सेक्टर १ येथील भारती बार या हॉटेल मध्ये तेथेच काम करणाऱ्या वेटरची हत्या झाल्याची घटना घडली आहे. पैश्याच्या देवाण घेवाणीतून हत्या झाल्याचा संशय असून याबाबत नेरुळ पोलीस अधिक तपास करत आहेत.
नवी मुंबईतील विशेषतः नेरुळमध्ये गुन्हेगारी प्रवृत्ती वाढल्याचे काही दिवसांपासून दिसून येत आहे. गेल्या महिन्याभरात नेरुलमधील ही दुसरी हत्येची घटना घडली आहे.नेरुळमधील भारती बार mमधील वेटर उदय होन्नया शेट्टी वय ४२ वर्ष हा त्याच्या २ सहकाऱ्यांसोबत हॉटेल मधे झोपला होता. बुधवारी सकाळी पावणे दहाच्या सुमारास उदयच्या सहकाऱ्याने त्याला उठवायचा प्रयत्न केला. मात्र उदय उठला नाही म्हणून शशिधरण व कृष्णा हे त्याचे दोघेही सहकारी उदय का उठत नाही बघायला गेले असता; उदयच्या डोक्यावर गंभीर जखमा आढळून आल्या. पोलिसांनी तातडीने ही घटना कळताच धाव घेतली. अधिक तपास केला असता; मयत उदय व वेटर विक्रम याचे पैश्याच्या देवाण घेवाणीवरून वाद असल्याचे निष्पन्न झाले. अधिक तपासाअंती नेरुळ पोलिसांनी तीन संशयीतांना ताब्यात घेतले असून पुढील तपास नेरुळ पोलीस करत आहेत.






