ही चड्डी बनियान गँग! आदित्य ठाकरेंच्या वक्तव्यावरून निलेश राणे सभागृहातच भिडले, म्हणाले, हिंमत असेल तर...
राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात आज आदित्य ठाकरे आणि निलेश राणे यांच्यात चांगलीच जुंपली. आदित्य ठाकरे यांच्या चड्डी बनियान गँग या वक्तव्यावरून निलेश राणेंचा पारा चांगलाच वाढला. जर हिंमत असेल तर नाव घ्या, जर नाव घ्यायची हिंमत नसेल तर असे शब्द सभागृहात वापरू नका, असं म्हणत त्यांनी आदित्य ठाकरे यांना खुलं चॅलेंज दिल्याचं पहायला मिळालं.
सभागृहात राज्यातील विविध प्रश्नांवर बोलत असताना आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटाला चिमचा काढला. आमदार संजय गायकवाड यांच्याकडून आमदार निवासातील कँटीनच्या कर्मचाऱ्याला मारहाण करण्यात आली होती. त्याचा संदर्भावरून आदित्य ठाकरे यांनी चड्डी बनियान गँग म्हणत शिंदेगटावर टीका केली.
मुख्यमंत्र्यांना युतीधर्म पाळणं गरजेचं आहे, त्यामुळे त्यांना काही गोष्टी सहन कराव्या लागतात. ज्यांच्या सोबत ते बसलेत ते चड्डी बनियान गँग, ते कोणालाही मारतात, काहीही करतात. पण त्यांच्यावर कारवाई होत नाही, असा टोला त्यांनी लगावला होता. तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे कौतुक याच्यासाठी करतो की, त्यांनी या प्रकरणात मोठी सहनशिलता दाखवली. ते कुणावरही कारवाई करत नाहीत. मात्र सध्या राज्यात जे सुरू आहे, मुंबईत जे सुरू आहे त्यावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. चड्डी बनियान गँगवर कडक कारवाई करावी आणि शासन काय असतं, ते दाखवून द्यावं असं आवाहनही त्यांनी केलं.
दरम्यान आदित्य ठाकरेंच्या चड्डी बनियान गँग वक्तव्यावर निलेश राणे चांगलेच संतापलेले पहायला मिळाले. “त्यांनी जे शब्द वापरलेत, नेमकी कुणावर कारवाई करावी हे सांगावं. नेमकं चड्डी कोण आणि बनियान कोण हे सांगावं. जर नाव घ्यायला भीती वाटत असेल तर सभागृहात असे शब्द वापरू नये आणि जर हिंमत असेल तर ते शब्द कुणासाठी होते हे सांगावं. केवळ टीका करायची म्हणून काहीही बोललं जातं असल्याचं ते म्हणाले.
Devendra Fadnavis News: शिंदे गटाच्या आणखी एका मंत्र्याला फडणवीसांचा दणका; शिंदेंची तातडीची बैठक
हे जे शब्द वापरले आहेत ते कुणासाठी आहेत, त्यांचं नाव घ्यावं. नाहीतर ते शब्द सभागृहाच्या कामकाजातून काढून टाकावे. बघूया त्यांच्यात किती हिंमत आहे, असं खुलं आव्हानही त्यांनी आदित्य ठाकरेंना दिलं.