File Photo : Garbage Issue
पुणे : पुणेकरांच्या कचऱ्याविषयी सातत्याने तक्रारी वाढू लागल्या आहेत. या तक्रारींवर मार्ग काढण्यासाठी आता रात्रपाळीतही कचरा उचलण्यात येणार आहे. त्याची अंमलबजावणीही लवकरच केली जाईल, अशी माहिती महापालिकेच्या घनकचरा विभागाचे उपायुक्त संदीप कदम यांनी दिली.
हेदेखील वाचा : ऐतिहासिक ‘शिंदे छत्री’ परिसरात निवासी क्षेत्र करण्याची सिंधीया ट्रस्टची मागणी; महानगरपालिकेची भूमिका काय?
आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध पक्षांच्या नेत्यांकडून महापालिका प्रशासनाबरोबर आढावा बैठका घेतल्या जात आहे. या बैठकांमध्ये कचरा साठणे, उघड्या जागेवरील कचरा अशा विविध प्रकारच्या तक्रारी केल्या गेल्या आहेत. यापूर्वी देखील महापालिका अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी तक्रारींची दखल घेत, घनकचरा विभागाला आदेश दिले होते. उघड्यावर कचरा टाकणे, सार्वजनिक अस्वच्छता करणे, बांधकामाचा राडारोडा टाकणाऱ्यांवर कारवाई करण्यात सुरुवात केली आहे.
एकीकडे कारवाई सुरु असताना, महापालिकेकडून कचरा गोळा करण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. आता दिवसाप्रमाणेच रात्रीच्यावेळी देखील कचरा गोळा केला जाणार आहे. नुकतेच महापालिकेच्या ताफ्यात 81 गाड्या (छोटा हत्ती) सामिल झाल्या आहेत. यापूर्वी ताफ्यात 270 गाड्या असून, या गाड्यांची संख्या साडे तीनशेच्या पुढे गेली आहे.
दुकानदारांकडून कचरा टाकला जातो उघड्यावर
शहरात अनेक ठिकाणी, भाजीपाला विक्रेते, व्यावसायिक, खाद्य पदार्थ विक्रेत्यांकडून रात्रीच्या वेळी दुकान बंद केल्यानंतर तेथेच कचरा टाकला जातो. हा उघड्यावर पडणारा कचरा आणि नागरिकांकडून टाकला जाणारा कचरा रात्रीच उचलण्यात येणार आहे. यासाठी आवश्यक वाहन चालक, बिगारी आदी कर्मचारी नियुक्त केले जाणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी लवकरच सुरु केली जाईल, अशी देखील माहिती देण्यात आली आहे.
शहरात हजारो मेट्रिक टन कचरा होतो गोळा
शहरात प्रतीदिन 2 हजार ते 2 हजार 200 मेट्रिक टन एवढा कचरा निर्माण होतो. सणाच्या कालावधीत कचरा निर्माण होण्याचे प्रमाणही मोठ्या प्रमाणावर वाढते. स्वच्छ संस्थेबरोबर करार गरजेचे असल्याची माहिती आहे. तसे न झाल्यास शहरात कचर्याची समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. करार संपुष्टात आल्यानंतरही सध्या स्वच्छ सेवकांकडून कचरा संकलन केले जात आहे. मात्र, करार लांबणीवर पडल्याने आणि अल्पकाळासाठी सातत्याने मुदतवाढ देण्यात येत असल्याने स्वच्छ कर्मचार्यांमध्येही नाराजीचा सूर देखील यापूर्वी पाहिला मिळाला होता.
हेदेखील वाचा : Pune News: शिक्षण संस्थांची गळचेपी सुरू असताना सरकार गप्प का? ‘या’ प्रकरणात राजीव गांधी स्मारक समिती आक्रमक