पुणे : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठे यश मिळाले आहे. सर्व एक्झिट पोलचे निष्कर्ष खोटे ठरवत महायुतीने जोरदार मुसंडी मारली आहे. राज्याच्या विधानसभा निकालानंतर राज्यात महायुतीचे सरकार स्थापन होणार आहे. उद्या म्हणजे 26 नोव्हेंबरला विधानसभेचा कार्यकाळ संपत आहे. त्यामुळे येत्या 24 तासातच महाराष्ट्रात नवे मंत्रिमंडळ स्थापन होणेही गरजेचे आहे. या पार्श्वभूमीवर आता ओबीसी आरक्षण आंदोलनकर्ते लक्ष्मण हाके यांनी महायुतीकडे मोठी मागणी केली आहे.
मी राज्यातील ५० टक्के लोकसंख्या असलेल्या समाजाचं प्रतिनिधित्व करतो. त्यामुळे मला केवळ विधानपरिषदेची आमदारकी नको तर गृह किंवा अर्थखातं द्यावं, अशी मागणी हाके यांनी केली आहे. गृहमंत्री, अर्थमंत्री किंवा इतर कोणतं कॅबिनेट मंत्रिपद द्यायला हवं. कारण मी राज्यात संख्येने अर्ध्या असणाऱ्या समाजाचं प्रतिनिधित्व करत आहे. असंही हाके यावेळी म्हणाले.
हे सुद्धा वाचा : ‘रश्मी शुक्ला अन् फडणवीस…’; काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे ‘ही’ मोठी मागणी
पुण्यात माध्यमांशी बोलताना लक्ष्मण हाके म्हणाले की, मनोज जरांगेंना लोक कंटाळले आहेत. त्यांनी महायुतीच्या १३० जागा पाडायची भाषा केली होती. मात्र त्यांना जेथे इशारा दिला होता, तेथील उमेदवार मोठ्या मताधिक्य़ांनी निवडून आले आहेत. जरांगे काहीही बोलत आहेत. आम्ही राजेश टोपेंना पाडलं आहे. जरांगे लबाड माणूस आहे. राज्य़ाचा निवडणूक निकाल जरांगेंना मोठी चपराक आहे. आम्ही ओबीसीला जवळचे मानणारी माणसे आहोत तसेच महायुतीची सुपारी घेतल्याचे जरांगे जाहीरपणे बोलले होते. बाप्पा सोनवणे निवडून आले तेव्हा तेही म्हणत होते की जरांगेमुळे निवडून आलो. आता आम्ही हिशोब चुकता केला आहे.
राज्यात महायुतीला यश
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा पूर्ण निकाल अखे समोर आला आहे. महाराष्ट्र निकालाचा अंतिम आकडा आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. महाराष्ट्रात 288 पैकी 132 जागांवर भाजपला यश आलं आहे. त्यापाठोपाठ एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला यश मिळालं आहे. शिंदे गटाला 57 जागांवर यश मिळालं आहे. तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 41 जागांवर यश मिळालं आहे. त्यामुळे महायुतीचा आकडा हा 240 वर पोहोचला आहे. सत्ता स्थापनेसाठी 145 जागांवर निवडून येणं आवश्यक आहे. पण महायुतीला त्यापेक्षाही जास्त 95 जागांवर विजय मिळाला आहे. त्यामुळे राज्यात महायुतीचं सरकार स्थापन होणार आहे.
दुसरीकडे महाविकास आघाडीला केवळ 46 जागांवर यश मिळालं आहे. यामध्ये ठाकरे गटाला सर्वाधिक 20, काँग्रेसला 16 आणि शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला केवळ 10 जागांवर यश मिळालं आहे. या निवडणुकीत समाजवादी पक्षाला 2 आणि अपक्षांना 10 ठिकाणी यश आलेलं आहे. पण मनसे आणि वंचित बहुजन आघाडी या दोन्ही पक्षांना खातंदेखील उघडता आलेलं नाही.