मुंबईतील मोनोरेलमध्ये अडकलेल्या प्रवाशांची सुटका (Photo Credit- X)
Mumbai Monorail: मुंबईमध्ये गेले काही दिवस मुसळधार पाऊस कोसळत आहे. आज दिवसभरात मुंबईत काही ठिकाणी 300 मिमी पेक्षा जास्त पाऊस झाला आहे. मात्र या पावसातच आता मोठी घटना मुंबईत घडली आहे. मुंबईतील मोनोरेल अचानक वाटेतच बंद पडली आहे. गेल्या दीड ते दोन तासांपेक्षा जास्त काळ प्रवासी मोनोरेलमध्ये अडकून पडले होते. अग्निशमन दल, पोलिस प्रशासन यांनी रेस्क्यू करत प्रवाशांची सुखरुप सुटका केली आहे. सुमारे तीन तासांपासून बचाव कार्य सुरू होते. मुसळधार पावसात प्रवाशांना वाचवण्यात आले. त्याचवेळी महानगरपालिकेचे वैद्यकीय पथक तयार ठेवण्यात आलं होतं. तसेच नजीकच्या महानगरपालिका रुग्णालयास सुसज्ज राहण्याचे आदेशही देण्यात आले होते.
#WATCH | Maharashtra: Teams of BMC, fire department and Mumbai Police are engaged in rescuing passengers from the Monorail stuck near Mysore Colony station in Mumbai. pic.twitter.com/78HvUSyr5A
— ANI (@ANI) August 19, 2025
मोनो रेल्वे सायंकाळी ६.१५ वाजेदरम्यान चेंबूर ते भक्ती पार्क दरम्यान बंद पडली. प्रवाश्यांनी आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ मदतीसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या १९१६ या क्रमांकावर संपर्क साधला. त्याची तातडीने दखल घेत मुंबई अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत तीन स्नोर्केल वाहनांच्या साहाय्याने मदत कार्य सुरु केले.
काही तांत्रिक कारणाने चेंबूर आणि भक्तीपार्क दरम्यान एक मोनोरेल अडकून पडली आहे. एमएमआरडीए, अग्निशमन दल आणि महापालिका अशा सर्वच यंत्रणा त्याठिकाणी पोहोचल्या आहेत. सर्व प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत आहे. त्यामुळे कुणीही काळजी करु नये, घाबरून जाऊ नये. सर्व…
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) August 19, 2025
मुसळधार पावसामुळे हार्बर मार्गावरील सेवा बंद असल्यामुळे अनेक प्रवाशांनी मोनोरेलमधून प्रवास करण्यास सुरुवात केली. यामुळे ट्रेनमध्ये नेहमीपेक्षा जास्त गर्दी झाली आणि वीजपुरवठा खंडित झाला. वीज गेल्यामुळे आपत्कालीन ब्रेक लागला आणि ट्रेन थांबली.
प्रवाशांची सुटका करणे हे आमचे सर्वोच्च प्राधान्य होते. महानगरपालिका आयुक्त, एमएमआरडीए, बीएमसी, अग्निशमन दल आणि पोलिसांचे अधिकारी घटनास्थळी उपस्थित होते. सर्व यंत्रणांनी तातडीने बचावकार्य सुरू केले आणि प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढले. काही प्रवाशांशी मी स्वतः बोललो आहे. सर्व प्रवासी लवकरच त्यांच्या घरी सुरक्षित पोहोचतील.
आज मुंबईत रेड अलर्ट जारी करण्यात आल्यामुळे, मी लोकांना आवाहन करतो की गरज नसल्यास घराबाहेर पडू नये. आज सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली असून, खासगी संस्थांनाही ‘वर्क फ्रॉम होम’ देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.