फोटो सौजन्य- प्रतिनिधी
दरवर्षी सप्टेंबर महिन्याच्या तिस-या शनिवारी आंतरराष्ट्रीय सागर तट स्वच्छता दिन जगभर साजरा केला जातो. याद्वारे वनस्पती आणि प्राणी यांचे संरक्षण करण्यासाठी आणि सागरी पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी स्वच्छ समुद्रकिनारे आणि समुद्र किनाऱ्यांबद्दल जागरूकता पसरवली जाते. यावर्षी, भारतीय तटरक्षक दल रत्नागिरीने आंतरराष्ट्रीय सागर तट स्वच्छता दिनानिमित्त शहराजवळील भाट्ये बीचवर आज (२१ सप्टेंबर) सकाळी ७.३० ते ९.३० या वेळेत स्वच्छ्ता मोहिमेचे आयोजन केले.
यावेळी मत्स्यव्यवसाय विभाग, सागरी पोलीस, कस्टम्स, एनसीसी कॅडेट्स, इक्रा इंग्लिश मीडियम स्कूलचे विद्यार्थी आणि गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या एनएसएस सदस्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेऊन हा कार्यक्रम यशस्वी केला. स्वच्छ आणि सुरक्षित समुद्रासाठी सहभागींमध्ये पर्यावरण संवर्धनाबाबत जागरूकता वाढवणे हा या मोहिमेचा उद्देश होता.
स्वच्छता मोहिम कार्यक्रमाचे उद्घाटन तटरक्षक दलाचे कमांडिंग ऑफिसर डीआयजी गिरीश चंदर यांच्या हस्ते झाले. यावेळी तटरक्षक अवस्थान यांचे बरोबरच तटरक्षक वायु अवस्थान रत्नागिरी यांचे सर्व अधिकारी व जवान यांनी या कार्यक्रमाचे हिरारीने नियोजन केले आणि सहभाग नोंदवला. याव्यतिरिक्त कार्यक्रमात विविध संस्थांचे व शाळांचे सुमारे ३०० स्वयंसेवक सहभागी झाले होते.
स्वच्छता मोहिमे दरम्यान एकूण ४५० किलो कचरा जमा केला गेला
स्वच्छता मोहिमे दरम्यान एकूण ४५० किलो कचरा जमा करण्यात आला. बायोडिग्रेडेबल कचरा आणि इतर पुनर्वापर करण्यायोग्य प्लास्टिक स्वतंत्रपणे गॅश बॅगमध्ये गोळा केला गेला. कचरा वर्गीकरण करून पुढील विल्हेवाटीसाठी नगर पालिकेकडे सुपूर्द करण्यात आला.
आंतरराष्ट्रीय सागर तट स्वच्छता दिन आणि भारतातील स्वच्छता मोहिम
1986 मध्ये अमेरिकेतील वॉशिंग्टन राज्याच्या पश्चिम किनाऱ्यावर आयोजित केलेल्या पहिल्या-वहिल्या स्वच्छतेच्या कार्यक्रमासह, समुद्र संरक्षणाद्वारे किनारपट्टी स्वच्छता दिवसाची सुरुवात करण्यात आली. आता, दर वर्षी, सप्टेंबर महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी साजरा केला जातो. भारतीय तटरक्षक दलातर्फे या दिवशी देशातील सर्व किनारी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये स्वच्छता मोहिम राबविण्यात येते. विविध नागरी संस्था, केंद्र आणि राज्य सरकारी संस्था, महापालिका, स्वयंसेवी संस्था, मत्स्यपालन संघटना, तेल संस्था आणि इतर खाजगी उद्योग या स्वच्छता मोहिमेत उत्साहाने सहभागी होतात. महाविद्यालयातील उत्साही NCC कॅडेट्स, NSS कार्यकर्ते शाळा आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यी या मोहिमेत सहभागी होतात. या दिनाद्वारे तरुण पिढीमध्ये जागरूकता आणि स्वच्छ समुद्रकिनाऱ्यांबद्दलची त्यांची बांधिलकीची जाणीव करुन दिली जाते.