गणेश कला क्रीडा मंच येथे नाम फाउंडेशनच्या 9 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात केंद्रीय जलसंसाधन मंत्री चंद्रकात आर. पाटील यांनी संबोधित केले. ते म्हणाले की, “केंद्र शासनाकडून प्रत्येक घरात पाणी पोहोचवण्यासाठी ‘हर घर जल’ योजना राबविली जात आहे. पाण्याची कमतरता दूर करण्यासाठी शासन प्रयत्नशील असून पडणाऱ्या पावसाचा प्रत्येक थेंब जमीनीत मुरवणे आवश्यक आहे. भविष्यातील पाण्याची कमतरता टाळण्यासाठी पाण्याचा पुनर्वापर करावा. देशातील लोकसंख्या, पशुधन, शेती यांना पाण्याची पुरेशी उपलब्धता असावी यासाठी पुढील दोन महिन्यात देशातील 20 नद्या एकमेकांशी जोडण्यात येणार आहे.”
यावेळी या कार्यक्रमामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री उदय सामंत, सुरतच्या आमदार संगीता पाटील, नाम फाउंडेशनचे अध्यक्ष नाना पाटेकर, संस्थापक मकरंद अनासपुरे उपस्थित होते.
‘हर घर जल’ योजनेमुळे महिलांची पाण्यासाठीची भटकंती थांबली
केंद्रीय मंत्री श्री. पाटील म्हणाले, ‘हर घर जल’ योजनेमुळे महिलांची पाण्यासाठीची भटकंती थांबली. देशातील महिलांचे दररोजचे साडेपाच कोटी तास वाचले आहेत. त्या वेळेचा उपयोग आर्थिक स्वावलंबनासाठी होऊ लागला आहे. शुद्ध पाणी घरी आल्यामुळे जलजन्य आजार कमी होऊन औषधावरील खर्च कमी झाला. जलसंधारणाच्या अनेक योजनांना गती देण्यात येत आहे. यामध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंगला प्राधान्य देण्यात आले आहे. जगाच्या 18 टक्के लोकंसख्या भारतात आहे. या तुलनेत स्वच्छ व पिण्यालायक पाणी केवळ 4 टक्के उपलब्ध आहे.
पुढील दोन महिन्यात देशातील 20 नद्या एकमेकांशी जोडण्याचे काम करण्यात येणार आहे
भविष्यात देशातील लोकसंख्या, पशुधन, शेती यांना पाण्याची पुरेशी उपलब्धता असावी यासाठी पुढील दोन महिन्यात देशातील 20 नद्या एकमेकांशी जोडण्याचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रत्येकाला पर्याप्त पाणी उपलब्ध होऊ शकेल. पाण्याची कमतरता भरुन काढण्यासाठी सर्वतोपरी कामे सुरु आहेत. यास समाजाचाही पाठिंबा आवश्यक आहे. पुढील काळात प्रत्येक घरावर रेनवॉटर हार्वेस्टिंग करण्यात येईल. भावी पिढीला पाण्याची कमतरता भासू नये यासाठी सर्वांच्याच प्रामाणिक प्रयत्नांची गरज आहे. नाम फाऊंडेशनच्या माध्यमातून होत असलेले काम यादृष्टीने अत्यंत प्रशंसनीय आहे.