मतदान करताना व्यक्तीचा हृदयविकारायच्या झटक्याने मृत्यू (फोटो- टीम नवराष्ट्र)
सातारा: विधानसभा निवडणुकीसाठी आज राज्यभरात मतदान होत आहे. सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. महाराष्ट्रात 288 विधानसभा मतदारसंघात आज मतदान पार पडत आहे.अशातच अनेक मतदान केंद्रावरील ईव्हीएम मशीन बंद पडल्याच्या घटना समोर आल्या आहेत. दरम्यान सातारा जिल्ह्यात मतदानाचा हक्क बजावत असताना एका व्यक्तीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. खंडाळा येथील एका व्यक्तीला मतदानकेंद्रामध्ये मतदानाचा हक्क बजावतानाच तीव्र हृदयविकाराचा झटका आला. यानंतर त्यांना रुग्णालयात उपचारासाठी नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
राज्यभरात आज विधानसभा निवडणुकीचे मतदान होत आहे. या पार्श्वभूमीवर मोरवे, ता. खंडाळा येथील प्राथमिक शाळेमध्ये प्रशासनाकडून निवडणूक कक्षात मतदान सुरु होते. यावेळी शाम नानासाहेब धायगुडे वय 67 हे आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदानकेंद्रावर दाखल झाले. ओळखपत्राची पडताळणी झाल्यानंतर ते इव्हीएम कक्ष (मतदान यंत्र) पोहोचले. त्यांनी मतदानयंत्राचे बटण दाबले आणि याचवेळी त्यांना तीव्र हृदयविकाराचा झटका आला. त्यामुळे ते जागीच कोसळले. मतदान केंद्रावर कर्तव्यास असलेल्या कर्मचार्यांना हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी संबंधित व्यक्तीस जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच धायगुडे यांचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले.
मृत धायगुडे हे मुंबई येथे सनदी लेखापाल (चार्टड अकौंटंट) होते. परंतू काही वर्षांपूर्वीच ते आपल्या मूळ गावी म्हणजेच मोरवे, ता. खंडाळा येथे स्थायिक झाले होते. मतदानाचा पवित्र हक्क बजावण्यासाठी निवडणूक आयोग आवाहन करीत असते. शहरातील उच्चभ्रू व उच्चविद्याविभूषित लोकही मतदानादिवशी मतदानाकडे पाठ फिरवून पर्यटनास निघून जातात. परंतू व्यवसायाने सनदी लेखापाल असलेले व गावाकडे येवून शेती करीत आपले निवृत्तीनंतरचे आयुष्य जगत असलेल्या धायगुडेंना मतदानाचा हक्क बजावतानाच त्यांचा मृत्यू झाल्याने अनेकांनी हळहळ व्यक्त केली. शेवटी मतदान करतानाच मृत्यू आल्याने, याचसाठी केला होता अट्टाहास, शेवटचा दीस गोड व्हावा… या अभंगाचा यानिमित्ताने अनेकांना प्रत्यय आला.
हेही वाचा: Maharashtra Exit Polls Result 2024: महाराष्ट्रात कुणाचं सरकार येणार? काय आहे एक्झिट पोलचा अंदाज
राज्यातील 288 जागांवर एकूण 4136 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. यात 3771 पुरुष, 363 महिला आणि तृतीयपंथी 2 उमेदवारांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील सर्व 288 विधानसभा जागांसाठी मतदान पूर्ण झाल्यानंतर लगेचच संध्याकाळी 6.30 च्या सुमारास एक्झिट पोलचे निकाल येण्यास सुरुवात होईल.
2019 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएने महाराष्ट्रात 161 जागा जिंकल्या होत्या. यात भाजपला 105 तर शिवसेनेला 56 जागा मिळाल्या होत्या. तर काँग्रेसला 44 तर राष्ट्रवादी काँग्रेसला 54 जागा मिळाल्या. याशिवाय इतरांना 29 जागा मिळाल्या होत्या. यातही छोट्या पक्षांना 16 जागा मिळाल्या. तर 13 जागांवर अपक्ष उमेदवार विजयी झाले होते. पण मुख्यमंत्रीपदावरून मतभेद झाल्याने ऐन सत्तास्थापनेच्या वेळी भाजप-शिवसेनेची युती तुटली. भाजपकडे बहूमत नसल्याने शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत जात सरकार स्थापन केले.
मतदानाच्या दिवशीच बीडमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. बीड विधानसभा मतदारसंघातल्या उमेदवाराचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला आहे. बीड विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार बाळासाहेब शिंदे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मतदान केंद्राबाहेरच बाळासाहेब शिंदे यांना हृदयविकाराचा झटका आला, यानंतर त्यांचा जागेवरच मृत्यू झाला आहे. दरम्यान परळीमध्ये वैजनाथ शहरातील सरस्वती विद्यालयातील केंद्राध्यक्ष जालिंदर जाधव यांनाही हृदयविकाराचा धक्का लागला आहे. यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.






