File Photo : Onion Market
सोलापूर : इंदापूर तालुक्यातील भांडगाव येथील शेतकऱ्याचे कांद्याचे पीक पावसाने शेतात सडून गेले आहे. त्यामुळे उत्पादित कांदा सध्या अतिशय खराब निघत आहे. त्यामुळे हा कांदा सोलापूर बाजार समितीतून दोनवेळा माघारी आला आहे. परिणामी, शेतकऱ्याला मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे.
पांडुरंग शिवाजी गायकवाड असे या नुकसानग्रस्त दुर्दैवी शेतकऱ्याचे नाव आहे. गायकवाड यांनी साडेतीन महिन्यांपूर्वी एक एकर क्षेत्रावर सारा पद्धतीने बियाणे विस्कटून कांद्याचे पीक घेतले. या पिकातील आंतरमशागतीची कामे, रासायनिक खते, औषध फवारणी यासाठी पिकाची काढणीपर्यंत सुमारे 40 हजार रुपये खर्च त्यांना आला आहे. हे पीक अडीच महिन्यांचे होते, परंतु सप्टेंबरचा शेवटच्या आठवडा व ऑक्टोबर महिन्यात चांगला पाऊस झाल्याने गेली महिनाभर या पिकाची काढणी पांडुरंग गायकवाड यांना करता आली नाही. त्यामुळे कांदा शेतात सडून जाऊन खराब झाला आहे.
गेल्या आठवड्यापासून या पिकाची काढणी सुरू असून, उत्पादित कांदा हा गोण्यामध्ये भरून दोनवेळा सोलापूर बाजार समितीमध्ये पाठविला. परंतु, तेथेही कांदा स्वीकारण्यात आला नाही. त्यामुळे उत्पन्न तर सोडाच उलट वाहतूक खर्च, गोण्याचा खर्च आदी खर्च खिशातून करावा लागत असल्याचे त्यांचा मुलगा दत्ता गायकवाड यांनी सांगितले.
उर्वरित कांदा पिकाची काढणी सुरू
सध्या उर्वरित कांदा पिकाची काढणी सुरू असून, शेतमजुरांवर खिशातून खर्च करावा लागत आहे. त्यामुळे या कांदा पिकापासून मोठे आर्थिक नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले. पावसामुळे खराब झालेल्या कांद्याचे पंचनामे करून शासनाने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणीही दत्ता गायकवाड यांनी केली आहे.