आमचा पक्ष नेत्यांच्या नाही तर कार्यकर्त्यांच्या बळावर चालणारा, भाजप जिल्हा उपाध्यक्ष संतोष चोथे यांचे प्रतिपादन
दीपक गायकवाड/मोखाडा: अगदी काल परवाच भाजपमध्ये नव्याने प्रवेश केलेले प्रकाश निकम यांनी पंचायत समितीवर कमळ फुलवणार अशी स्वतंत्र पत्रकार परिषद घेऊन घोषणा केली.त्यांनी दिलेली ग्वाही ही भाजपातील बहूतेक कार्यकर्त्यांना रुचली नसल्याचे चित्र असून तालुक्यातून भाजपच्याच कार्यकर्त्यांनी प्रचंड नाराजी व्यक्त करीत एक महत्त्वाची बैठक घेतली आहे. त्यामध्ये भाजप हा पक्ष नेत्यांच्या नाही तर कार्यकर्त्यांच्या बळावर चालणाऱ्या विचार धारेचा पक्ष असून कोणीही एक नेता सत्तेचे समीकरण सोडवू शकत नाही तर भाजपचे कार्यकर्तेच पंचायत समितीवर सत्ता प्रस्थापित करणार आहेत.त्यामुळे निकम यांनी एकट्याने पत्रकार परिषद न घेता भाजपच्या जुन्या प्रतिनिधींना सोबत घेऊन पत्रकार परिषद घ्यायला हवी होती असं मत भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष चोथे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले आहे.त्यावरुन निकम यांच्या पक्ष प्रवेशावरुन भाजपत समीकरणांचा कलगीतुरा लागल्याचे स्पष्टपणे प्रतित होत आहे.
ते पुढे म्हणाले की प्रकाश निकम भाजपमध्ये नवीन आहेत ते लवकरच भाजपची ध्येय धोरणं समजून घेतील अशी आम्ही आशा व्यक्त करतो.त्यामुळे एकंदरीत निकम यांचा भाजप प्रवेश आणि स्वतंत्र पत्रकार परिषदेत मांडलेला स्वतंत्र सारिपाठ स्थानिक भाजपला रुचला नसल्याचे यातून स्पष्ट दिसून आले आहे.
Maharashtra Politics: मराठा आंदोलनाआधीच बीडमध्ये मोठी घटना; OBC नेते लक्ष्मण हाकेंच्या गाडीवर…
अगदी काल परवाच शिवसेनेतून भाजप मध्ये गेलेले प्रकाश निकम यांनी पत्रकार परिषद घेतली.त्यामध्ये त्यांनी शिवसेना सोडण्याची कारणे सांगितली तर पंचायत समितीवर कमळ फुलवू असे आव्हानच जणू मित्र पक्षांना दिले होते.मात्र त्यांची हीच पत्रकार परिषद भाजपच्या जीव्हारी लागली असून निकम यांनी कार्यालयात येताना किंवा ही पत्रकार परिषद घेताना भाजपाचे तालुकाध्यक्ष किंवा पदाधिकारी यांना विश्वासात घेऊन त्यांच्या सोबतीने घ्यायला हवी होती असे मत अनेकांनी व्यक्त केले आहे. यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी नाराजी सुद्धा व्यक्त केली.
प्रकाश निकम यांच्या येण्याने आम्ही नाराज नाही आम्हाला आनंदच आहे, मात्र सर्व जुन्या भाजप पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन यापुढे पत्रकार परिषद किंवा कोणताही संघटनात्मक कार्यक्रम व्हायला हवा असं आमचं प्रामाणिक मत असल्याचे तालुका अध्यक्ष मिलिंद झोले यांनी यावेळी सांगितले. त्यामुळे निकम यांच्या प्रवेशाआधी स्थानिक भाजपचा विरोध असल्याची चर्चा होत होती त्याला आता स्पष्ट दुजोरा मिळाला असल्याचे एकंदरीत घटनाक्रमातून दिसून येत आहे.
प्रकाश निकम यांनी पत्रकार परिषद घेऊन मी शिवसेना का सोडली या बाबतची माहिती दिली यावेळी पंचायत समितीवर कमळ फुलेल असा उल्लेख केला मात्र त्यानंतर मोखाडा भाजपमध्ये असंतोषाचे वातावरण पसरल्याचे दिसून आले आणि दुसऱ्या दिवशी भाजपाने निकम यांना वगळून पत्रकार परिषद घेत सत्ता आणू मात्र ती नेत्यांचे नाही तर कार्यकर्त्यांच्या भरोशावर आणू असे सांगितले यावरून निकम यांचा प्रवेश होतो ना होतो तोच भाजपामध्ये जुना नवा वाद निर्माण तर नाही झाला ना ? असा प्रश्न आता या बैठकीमुळे उपस्थित होत आहे.आता यावर भाजपचे वरीष्ठ नेते काय भूमिका घेतात ते पाहणे औचित्यपूर्ण ठरणार आहे.