
पालघरमध्ये पुराचे थैमान; वीजपुरवठा ठप्प, 2 लाख लोक अंधारात, तब्बल 900 नागरिकांचे स्थलांतर
पालघर : मुसळधार पावसामुळे पालघर जिल्ह्यातील डहाणू आणि तलासरी तालुक्यांमध्ये पूरस्थिती गंभीर झाली असून, अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. सखल भाग जलमय झाल्याने आणि वीजपुरवठा खंडित झाला आहे. प्रशासनाने मोठ्या प्रमाणावर बचाव आणि मदतकार्य हाती घेतले आहे. आतापर्यंत २१८ कुटुंबांतील ८९१ नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले असून, पूरामुळे वीज यंत्रणेचे मोठे नुकसान झाल्याने सुमारे दोन लाख नागरिक अंधारात आहेत.
जिल्हाधिकारी डॉ. इंदू राणी जाखड यांनी सांगितले की, बुधवारी रात्रीपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे डहाणू आणि तलासरी हे भाग सर्वाधिक प्रभावित झाले आहेत. परिस्थिती लक्षात घेऊन जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक संस्थांना गुरुवारी सुट्टी जाहीर करण्यात आली. पूराच्या पाण्यामुळे महावितरणच्या १७ वीज उपकेंद्रांमध्ये पाणी शिरले. सुरक्षेच्या दृष्टीने १०६ वीजपुरवठा वाहिन्या बंद करण्यात आल्या.
डोलरपाडा आणि बोर्डी येथील उपकेंद्रे पूर्णपणे पाण्याखाली गेली आहेत. डोलरपाडा उपकेंद्रात रात्रभर अडकलेल्या एका ऑपरेटर आणि सुरक्षा रक्षकाची स्थानिक ग्रामस्थांनी गुरुवारी सकाळी सुखरूप सुटका केली.
एनडीआरएफचे बचावकार्य
तलासरी आणि डहाणू येथे राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल तैनात करण्यात आले आहे. याशिवाय, वसई-विरार महापालिकेचे आपत्कालीन पथक आणि चारोटी येथील स्थानिक बचाव पथकही मदतकार्यात सहभागी झाले आहेत. दरम्यान, जिल्ह्यातील एका नाल्यात एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला असून, त्याची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
धरणांतून विसर्ग; नागरिकांना सतर्कतेचा इशारा
कुर्जे आणि धामणी धरणे पूर्ण क्षमतेने भरल्याने त्यातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. कालव्यांच्या काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून, नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, तसेच पूरग्रस्त रस्ते, पूल आणि ओढे-नद्यांपासून दूर राहावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
ठाणे जिल्ह्यातही पावसाचा तडाखा
बदलापूर आणि वांगणी परिसरातही मुसळधार पावसामुळे पन २७ वीजखांब पडले असून, बुधवारी सायंकाळपासून सुमारे २७ हजार वीजग्राहकांचा पुरवठा खंडित झाला आहे. ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागानुसार, गुरुवारी सकाळी साडेआठपर्यंतच्या २४ तासांत ९९.३२ मिमी पावसाची नोंद झाली. यंदाच्या मान्सून हंगामात ठाण्यात आतापर्यंत १८९३.७८ मिमी पाऊस झाला असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत ही नोंद लक्षणीयरीत्या अधिक आहे.