चिंचणी ग्रामपंचायतीत दप्तर घोटाळा उघड; ग्रामसभेत कबुली, तीन महिन्यांपासून महत्त्वाची कागदपत्रे गायब असल्याचे स्पष्ट (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
माहितीनुसार, काही कागदपत्रे गेल्या तीन महिन्यांपासून सील अवस्थेत असून, अनेक आवश्यक नोंदी व दस्तऐवज गायब असल्याचे आढळून आले आहे. पदभार स्वीकारताना माजी ग्रामविकासा अधिकारी मिलिंद गायकवाड यांनी ही कागदपत्रे ताब्यात दिलेली नसल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांकडून ग्रामसभेत करण्यात आला.
हे देखील वाचा : शिरोलीत ऊसाच्या फडाला भीषण आग; 30 एकर ऊस जळून खाक, वेळीच खबरदारी घेतली म्हणून…
या संदर्भात चिंचणी गावातील सुमारे १५ ग्रामपंचायत सदस्य व जागरूक नागरिकांनी गेल्या तीन महिन्यांपासून प्रशासनाकडे कागदपत्रांची मागणी केली होती. मात्र, प्रशासनाकडून केवळ चालढकल करण्यात येत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. सोमवारी झालेल्या ग्रामसभेत ही कागदपत्रे तातडीने जनतेसमोर सादर करण्याची मागणी करण्यात आली असता, तब्बल दीड तास टाळाटाळ करण्यात आली. अखेर सायंकाळी ७.४५ वाजता कागदपत्रे उपलब्ध नसल्याची कबुली दिली.
दरम्यान, याबाबत ग्रामपंचायत अधिकारी प्रतीक्षा बारी-करबट यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी मोबाईलवर संपर्क केला असता त्यांचा प्रतिसाद मिळाला नाही. जर कागदपत्रे ग्रामपंचायत दप्तरी नसतील, तर ती नेमकी कोणाच्या ताब्यात आहेत किंवा चोरीला गेली आहेत का? याबाबत चिंचणीच्या नागरिकाना रक्ष्ट माहिती दिली पाहिजे, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. ग्रामपंचायतीचा कारभार पारदर्शक ठेवून दोषींवर तातडीने कठोर कारवाई करण्यात यावी, अशी एकमुखी मागणी ग्रामस्थ व ग्रामपंचायत सदस्यांकडून करण्यात आली आहे.
पंचायत समिती, डहाणूच्या गट विकास अधिकारी पल्लवी सस्ते यांनी म्हटले आहे की, ८८ नवीन ग्रामपंचायत अधिकारी हजर झाल्यानंतर त्यांनी कार्यभार स्वीकारताना संबंधित बाजें यादी पंचायत समितीला सादर केलेली आहे. तरीही दप्तर गहाळ झाल्याबाबत लेखी तक्रार प्राप्त झाल्यास, त्याची सखोल चौकशी करून नियमानुसार पुढील कारवाई करण्यात येईल.






