पंढरपूर विकास आराखड्याला मिळाली अंतिम मंजुरी! कॉरिडॉर, पुनर्वसन आणि शहर विकासासाठी ३,९९३ कोटींच्या निधीची तरतूद
पंढरीच्या सर्वांगीण विकासाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. राज्य शासनाने शिखर समिमीने मंजूर केलेल्या (मंदिर परिसर वाणिज्य विकास आराखडा) चा शासन आदेश जारी केल्याने बहुचर्चित पंढरपूर प्रकल्प प्रत्यक्षात साकारण्याचा दिशाने मोठे पाऊल पडली आहे. दीर्घ काळापासून चर्चेत असलेल्या पंढरपूर कॉरिडॉर (मंदिर परिसर वाणिज्य विकास आराखडा) प्रकल्पाला अखेर राज्य शासनाची अंतिम प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसराचा सर्वांगीण विकास, वारकऱ्यांसाठी अत्याधुनिक सुविधा, शहर सुशोभीकरण आणि पुनर्वसन अशा महत्त्वाकांक्षी कामांसाठी तब्बल ३ हजार ९९३ कोटी ९० लाख रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.(फोटो सौजन्य – AI)
नियोजन विभागाच्या सहसचिव गीतांजली बाविस्कर यांच्या स्वाक्षरीने यासंदर्भातील शासन अध्यादेश जारी करण्यात आला असून, जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांची सनियंत्रण अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे आता पंढरपूरच्या विकासाच्या नव्या पर्वाला सुरुवात होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरवर्षीं लाखो भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरात येतात. या भाविकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मंदिर परिसरात भव्य कॉरिडॉर उभारण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.
प्रशासनाने आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर प्रकल्पाच्या भूमिपूजनाची तयारी सुरू केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विकास आराखड्याचे भूमिपूजन होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अंतिम मंजुरीनंतर आता विठुरायाच्या नगरीचा चेहरामोहरा बदलणार असून, पंढरपूरला जागतिक दर्जाचे धार्मिक पर्यटन केंद्र बनविण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलले गेले आहे.
यंदाच्या आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर लाखो वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी जिल्हा प्रशासन आणि पोलिस यंत्रणा सज्ज झाली असून संभाव्य दहशतवादी कारवायांना आळा घालण्यासाठी सोलापूर जिल्ह्यात कलम १६३ लागू करण्यात आले आहे. या आदेशानुसार जिल्ह्यात नव्याने राहण्यासाठी येणाऱ्या व्यक्तींची माहिती संबंधित पोलिस ठाण्याला देणे नागरिकांसाठी बंधनकारक करण्यात आले आहे. पोलिस अधीक्षकांनी यासंदर्भात आदेश जारी केले आहेत. पंढरपूर येथे १९ जुलै ते २९ जुलैदरम्यान आषाढी यात्रा भरत असून २४ जुलै (दशमी), २५ जुलै (देवशयनी आषाढी एकादशी) आणि २९ जुलै (पौर्णिमा) हे यात्रेचे प्रमुख दिवस आहेत.
प्रकल्पाची अंमलबजावणी वेळेत पूर्ण करण्यासाठी जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. संपूर्ण विकास आराखड्याची विभागणी तीन प्रमुख टप्प्यांत करण्यात आली आहे. यामध्ये पंढरपूर कॅरीडोर, शहर विकास आणि पुनर्वसन व बाधितांचा मोबदला अशा तीन टप्प्यांमध्ये कामाची विभागणी करण्यात आली आहे प्रत्येक टण्यासाठी वेगवेगळ्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.






