KYC न केल्यास पेन्शन बंद, कराडमधील ७११ लाभार्थ्यांना अंतिम इशारा (Photo Credit- X)
संजय गांधी निराधार योजना, तसेच श्रावणबाळ सेवा राज्य योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात दरमहा थेट लाभ हस्तांतरण (DBT) पद्धतीने पेन्शन जमा केली जाते. मात्र, या प्रक्रियेसाठी आधार प्रमाणीकरणासह केवायसी करणे अत्यावश्यक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
याबाबत तहसीलदार कल्पना ढवळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित लाभार्थ्यांना यापूर्वीही वेळोवेळी सूचना देण्यात आल्या होत्या. तरीही अनेकांनी केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. त्यामुळे आता लेखी नोटीस देऊन अंतिम मुदत जाहीर करण्यात आली आहे.
ज्या लाभार्थ्यांनी अद्याप केवायसी केलेली नाही, त्यांनी ३० मार्च २०२६ पर्यंत तहसील कार्यालय, कराड (संजय गांधी शाखा) येथे प्रत्यक्ष उपस्थित राहून आधार कार्ड, बँक पासबुक आणि आवश्यक कागदपत्रांसह केवायसी पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. दिव्यांग लाभार्थ्यांनी युडीआयडी (UDID) कार्डही सादर करणे बंधनकारक आहे.
निर्धारित मुदतीत केवायसी न केल्यास संबंधित लाभार्थ्यांची पेन्शन थांबविण्याचा निर्णय घेतला जाणार असून, त्याची संपूर्ण जबाबदारी लाभार्थ्यांवरच राहील, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे. दरम्यान, पात्र लाभार्थ्यांनी कोणताही विलंब न करता तात्काळ केवायसी प्रक्रिया पूर्ण करून शासनाच्या योजनांचा लाभ कायम ठेवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
Satara News: ६५ व्या वर्षी निवृत्ती नाही…! रिक्षा चालवणाऱ्या मंगला आजींची साताऱ्यात चर्चा






