वृक्षांसाठी उभे राहिलेले हात जिंकले! आराखडा तयार; जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपामुळे महामार्गावरील वृक्षतोड थांबली
महाराष्ट्रात विकास कामांच्या नावाखाली हजारो वृक्षांची निर्दयी कत्तल सुरू असताना, भंडाऱ्यात मात्र काही निसर्गप्रेमींनी उभा केलेला लढा अखेर यशस्वी ठरला. राष्ट्रीय महामार्ग क्र. ५३ च्या चौपदरीकरणासाठी शेकडो वर्षे जुनी विशाल वृक्षसंपदा संपवण्याचा घाट घातला जात असतानाच भंडाऱ्यातील पर्यावरणप्रेमींनी तीव्र आंदोलन छेडले आणि अखेर प्रशासनाला निर्णय बदलावा लागला जिल्हाधिकारी सावंत कुमार यांनी घेतलेल्या ठाम भूमिकेमुळे आता या मार्गावरील एकही विशाल वृक्ष तोडला जाणार नसल्याचे स्पष्ट झाले. जिल्हाधिकारी कुमार यांनी स्वतः या विषयात हस्तक्षेप करीत, अपरिहार्य गरज सिद्ध केल्याशिवाय आणि सखोल तांत्रिक पडताळणीशिवाय एकही झाड तोडू नये, असे स्पष्ट निर्देश दिले. प्रशासन, राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प विभाग आणि पर्यावरणप्रेमी यांच्यात झालेल्या बैठकीनंतर नव्याने आराखडा तयार करण्यात आला.(फोटो सौजन्य – AI)
या आंदोलनात डॉ. नितिन तुरसकर, मो. सईद शेख, प्रमोद केसलकर, प्रवीण मेहर, वैभव चोपकर, हेमंत साकुरे, शैलेंद्र श्रीवास्तव, सदानंद इल्मे, हिवराज उके, नितिन कुथे, हेमंत साकुरे, आबिद सिद्दिकी, डॉ. विनोद देशमुख, प्रणय बडवाईक, प्रवीण मेहर, प्रशांत देसाई, कविता नागापुरे, विजय निचकड़े, चंदू वंजारी, चंद्रशेखर भिवगडे या वृक्षप्रेमींनी सहभाग नोंदवला होता.
फुलमोगरा ते कारधा मार्गावरील कडुलिंब, पिंपळ, चिंच, सागवान, करंजी, सिसम, आंबा यांसारखी १०० ते १५० वर्षे जुनी वृक्षसंपदा चौपदरीकरणाच्या नावाखाली धोक्यात आली होती. ११२ वृक्षांपैकी तब्बल ४५ वृक्षांची तोड झाल्यानंतर परिसरात संतापाची लाट उसळली. विशेषतः कडुलिंबाच्या वृक्षांची झालेली कत्तल पाहून अनेक नागरिक भावनिक झाले होते. वृक्षतोडीविरोधात उभ्या राहिलेल्या आंदोलनाची सुरुवातीला काहींनी खिल्ली उडवली. ‘रस्ता होणारच’, ‘वृक्ष तर कापलीच जातील’ अशा प्रतिक्रिया दिल्या काहींनी आंदोलनकर्त्यांवर विकासविरोधी असल्याचे शिक्के मारण्याचाही प्रयत्न केला. मात्र सातत्य, अभ्यासपूर्ण भूमिका आणि निसर्गाबद्दलची प्रामाणिक तळमळ यामुळे अखेर आंदोलनाने प्रशासनालाच नव्याने विचार करायला भाग पाडले.
नवीन आराखड्यानुसार, या मार्गाचे दुपदरीकरण करण्यात येणार असून वृक्षांच्या बाजूने सर्विस रोड उभारण्यात येईल. विशेष म्हणजे, यापुढे एकही विशाल वृक्ष तोडला जाणार नाही, अशी स्पष्ट भूमिका प्रशासनाने घेतली आहे. एवढेच नव्हे तर दुभाजकावर मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. ज्या वृक्षांची कत्तल झाली त्याबद्दल आजही मनात वेदना आहेत; मात्र यापुढे एकही वृक्ष तोडला जाणार नाही, याची काळजी प्रशासन घेईल,” अशी भावना जिल्हाधिकारी सावन कुमार यांनी व्यक्त केली.






