प्रो कबड्डी लीग स्पर्धेत घरच्या मैदानावर पुणेरी पलटण अपयशी, यु मुम्बाचा ४३-२९ असा सोळा गुणांनी विजय
पुणे : पुणेरी पलटणला घरच्या मैदानावर यशस्वी सुरुवात करण्यात अपयश आले. सामन्याची सुरुवात पुणेरी पलटणने शानदार केली, परंतु, या गुणांचे सातत्य त्यांना राखता आले नाही. या विजयाने यु मुम्बाने तिसऱ्या क्रमाकांवर झेप घेतली. मध्यंतराला मिळवलेली १९-१६ अशी आघाडी टिकविण्यात पुणेरी पलटणला आलेले अपयश नक्कीच त्यांच्या संघ व्यवस्थापनाला चिंतेत टाकणार ठरणार यात शंका नाही. उत्तरार्धात पुण्याचा स्थानिक खेळाडू अजित चव्हाणने चार चढाईतच पलटण संघाला निष्प्रभ केले. अजितच्या या चार चढाईतच यु मुम्बाने आत्मविश्वास मिळविला. उत्तरार्धात पहिल्या पाच मिनिटातच लोण स्विकारावा लागल्यनंतर आलेल्या दडपणातून पलटण संघ बाहेर पडू शकला नाही. सामना संपताना आणखी एक लोण चढवत यु मुम्बाने उत्तरार्धातील आक्रमक खेळाच्या जोरावर शानदार विजय मिळविला.
अजित चव्हाणने एकट्याने फिरवला गेम
अजित चव्हाणने चढाईत सुपर टेन करताना १२ गुणांची कमाई केली. त्याचवेळी बचावपटू सोमवीर आणि सुनिल कुमारने हाय फाईव्ह पूर्ण केले. पलटणकडून पंकज मोहितने ९ गुणांची कमाई केली. बचावात अबिनेश नंदराजनने ४ गुणांची कमाई केली. कर्णधार आकाश शिंदे आणि मोहित गोयत आपली छाप पाडू शकले नाहीत. सामन्यातून मुम्बाच्या चढाईपटू मनजीत आणि कर्णधार सुनिल कुमार विक्रमाच्या यादीत गेले. मनजीतने लीगच्या इतिहासातील ७०० गुणांचा टप्पा ओलांडला, तर सुनिल लीगमधील सर्वात यशस्वी कर्णधार ठरला. हा त्याचा ७४वा विजय ठरला. यापूर्वीचा ७३ विजयाचा विक्रम फझल अत्राचलीच्या नावावर होता.
पुणेरी पलटणचा बचाव पडला कमजोर
पूर्वार्धात अबिनेशच्या डॅशने जखमी झालेल्या अजित चव्हाणने पुरेश विश्रांती घेत मध्यंतरानंतर आपला जोर दाखवला. पहिल्याच मिनिटाला अव्वल चढाई करत अजितने मुम्बाला १९-१९ अशी बरोबरी राखून दिली आणि त्यानंतर पुढच्या चढाईत एक गुण घेत संघाला आघाडीवर नेले. पाठोपाठ तब्बल २० मिनिटांनंतर परवेश बैन्सवावलने पहिला गुण मिळवत संघाची आघाडी कायम राखली. मात्र, या चढाओढीत सुनिल कुमार बाहेर गेल्याने यु मुम्बालाही गुण गमवावा लागला होता. अजितने तिसऱ्या चढाईत डू और डाय स्थितीत दोन्ही बचावपटूंना बाद करुन पाच मिनिटांत पलटणवर लोण देत २६-२० अशी मोठी आघाडी घेतली. अजितने सलग चौथ्या लढाईत बोनससह दोन गुणांची कमाई करुन पलटणचा बचाव खिळखिळा केला. यामुळे उत्तरार्धातील पहिली दहा मिनिटे संपली तेव्हा मुम्बाने ३१-२३ अशी मोठी आघाडी मिळविली होती.
यु मुम्बाने घेतलेली आघाडी ठेवली कायम
उत्तरार्धातील अखेरच्या टप्प्यात आघाडीकडे लक्ष ठेवत मुम्बा संघाने खेळाची गती कमी केली. याचा फायदा घेण्यासाठी पुणेरी पलटणची बचावफळी एकवटली होती. मनजीत आणि अजित चव्हाण यांची पकड करुन मुम्बावर दडपण आणले. पण, त्याच वेळी एकदा सोमवीरने, तर दुसऱ्यांदा सुनिल कुमारने तीन खेळाडूंच पलटणच्या चढाईपटूंची कोंडी केली आणि लागोपाठ अव्वल टॅकलचे चार गुण मिळवले. चढाईपटूंनी वेळ काढण्याचे काम चोख बजावले आणि बचावपटूंनी आपली जबाबदारी या टप्प्यात सुरेख पार पाडत पलटणवरील दडपण वाढवले. मनजीतने नंतर अबिनेशनला बाद करत एक मिनिट बाकी असताना पलटणवर दुसरा लोण दिला. या वेळी मुम्बाने ४३-२८ अशी मोठी आघाडी घेत उर्वरित वेळेत विजयाची औपचारिकता पूर्ण केली.
प्रेशरने पुणेरी पलटणला शेवटपर्यंत मिळाले नाही यश
पूर्वार्धातील लढतीत मध्यंतराच्या अखेरच्या मिनिटापर्यंत पिछाडीवर राहिलेल्या पुणेरी पलटणला डू और डायच्या चढाईत पंकज मोहितने अव्वल चढाईत मिळविलेल्या तीन गुणांमुळे पलटणसाठी सामन्याचे चित्र बदलले. तेव्हा १४-१२ अशा पिछाडीवरून पलटणने एकदम १४-१५ अशी आघाडी घेतली आणि नंतर मध्यंतराला एक मिनिट बाकी असताना यु मुम्बावर लोण चढवत पलटणने मध्यंतराला १९-१६ अशी आघाडी घेतली. पंकजच्या त्या चढाईपर्यंत पलटणचा जोर सगळा बचावपटूंच्या कामगिरीवरच अवलंबून होता. यु मुम्बासाठी देखिल फार काही वेगळे चित्र नव्हते. अजित चव्हाण आणि झफरदानेश या चढाईपटूंचे अपयश त्यांना मागे ठेवत होते. पण, मनजीतच्या खोलवर चढायांना सुनिल कुमारच्या बचावाची साथ मिळत होती. पण, एका क्षणी बचावफळीने केलेली चूक त्यांच्यासाठी पूर्वार्धात तरी महागात पडली होती.