भविष्यात कबड्डी ऑलिम्पिकमध्ये जाण्याची शक्यता; जास्तीत जास्त लीग स्पर्धांमुळे युवा खेळाडूंना पोत्साहन : PKL चेअरमन अनुपम गोस्वामी
पुणे : कबड्डीच्या अकराव्या पर्वाचा अंतिम थरार पुण्यात पाहायला मिळणार आहे. अनेक सामने पुण्याच्या बालेवाडी बॅडमिंटन हॉल येथे होणार आहेत. या अनुषंगाने प्रो-कबड्डी लीगचे चेअरमन अनुपम गोस्वामी यांनी माध्यमांशी संवाद साधला. कबड्डी लीगच्या अकराव्या पर्वाचे दोन टप्पे हैद्राबाद आणि नोएडा येथे संपून आता ज्या राज्याने कबड्डीला अंगाखांद्यावर खेळवले, त्या महाराष्ट्रात पुणे श्रीशिवछत्रपती संकुल, म्हाळुंगे बालेवाडी येथील बॅडमिंटन हॉल येथे तिसरा टप्पा सुरू होत आहे. पहिल्या टप्प्यात जी तीव्रता खेळामध्ये दिसून आली आहे, ती तीव्रता नोएडाच्या टप्प्यात आणखी वाढली. आता, पुणे येथील टप्प्यात ती तीव्रता कळस गाठेल आणि स्पर्धेतील सामने जास्तीत जास्त चुरशीचे होतील, असे मशाल स्पोर्ट्सचे प्रमुख व कबड्डी लीगचे चेअरमन अनुपम गोस्वामी यांनी सांगितले.
पुण्याच्या प्रेक्षकांसाठी मेजवानी
पुणे येथे 3 ते 24 डिसेंबर 2024 या कालावधीत होणाऱ्या या लीगच्या टप्प्याच्या पार्श्वभूमीवर अनुपम गोस्वामी यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, महाराष्ट्रातील कबड्डीची लीगची लोकप्रियता ही सर्वश्रुत आहे. पुणे येथील कबड्डीच्या चाहत्यांना या लीगच्या मोठ्या टप्प्यामध्ये देशभरातील आणि जगातील खेळाडूंचा चांगला खेळ बघायला मिळेल. या पर्वाने नवोदित खेळाडूंची एक नवी पिढी समोर आली आहे. यामध्ये अजित चव्हाण, आकाश शिंदे, शिवम पाठारे यांचा प्रामुख्याने उल्लेख करता येईल.
महाराष्ट्राच्या पुणेरी पलटण आणि यू मुंबाच्या संघांची स्पर्धेत मोठी आगेकूच
यंदाच्या हंगामातील तीव्रता पहिल्या टप्प्यापासूनच आहे. दुसऱ्या टप्प्यात आणखी ती वाढली आहे, आता ती पुण्यात सर्वोच्च क्षणापर्यंत येऊन ठेपेल, अशी आम्हाला खात्री आहे. हरियाणा स्टिलर्स संघासह महाराष्ट्राजवळचे असणारे पुणेरी पलटण आणि यू मुंबा हे दोन संघ चांगली आगेकूच करीत आहेत. पहिले सहा संघ बाद फेरीसाठी पात्र ठरणार असले, तरी कोणता संघ पात्र ठरेल हे अद्याप स्पष्ट होत नाही. गुणतालिकेतील प्रत्येक क्रमांकावरील संघाची गुणसंख्या बघितली तर त्यामध्ये फारसा फरक नाही. त्यामुळे हीच चुरस हा टप्पा अधिक रंगतदार करेल यात शंका नाही, असेही अनुपम गोस्वामी यांनी सांगितले
कबड्डी लवकरच ऑलिम्पिकमध्ये येईल
कबड्डी लीगचा प्रसार हा दिवसेंदिवस वाढतच आहे. यामुळे आम्हाला कबड्डी लवकरच ऑलिम्पिकमध्ये येईल असा विश्वास वाटतो. मात्र, त्यासाठी खंडीय स्पर्धा वाढल्या पाहिजे, असे गोस्वामी यांनी सांगितले. पुणेरी पलटण हा गतविजेता संघ असून आजही विजयी संघच आहे आणि त्याच पद्धतीने तो खेळतदेखील आहे. आम्हाला आता घरच्या मैदानावर चाहत्यांसमोर खेळताना अधिक उत्साह येणार आहे. पुणेकरांचा मिळणारा प्रतिसाद खेळाडूंचे मनोधैर्य उंचावण्यास नक्कीच फायद्याचे ठरेल, असे पुणेरी पलटण संघाचे प्रशिक्षक बी सी रमेश यांनी सांगितले.
सर्व आघाड्यांवर आमचे खेळाडू कौशल्य पणाला लावताहेत
आमचा संघ चांगली कामगिरी करत आहे. सर्व आघाड्यांवर आमचे खेळाडू कौशल्य पणाला लावत आहेत. कबड्डी हा सांघिक खेळ असून आमचे खेळाडू या सांघिकतेचे चांगले प्रदर्शन करीत असल्याचे पुणेरी पलटण संघाचा कर्णधार आकाश शिंदे याने सांगितले. यू मुंबा संघातील 14 लढतीत 114 गुण पटकावणारा यशस्वी चढाई पटू पुण्याचा अजित चव्हाण म्हणाला की, घरच्या मैदानावर एका घरच्या संघाकडून दुसऱ्या घरच्या संघाविरुद्ध खेळताना मनावर दडपण असले तरी, ते मैदानात दिसणार नाही. आम्ही विजयासाठीच खेळू असा निर्धार त्याने सांगितले.
यू मुंबा संघाचा प्रशिक्षक घोलमरेझा मजंदरानी म्हणाले की, या दोन महाराष्ट्रातील संघांमधील लढतीचे कुतुहल जेवढे चाहत्यांमध्ये आहे, तेवढेच आम्हालाही आहे. लीगमधील पहिल्या सामन्यात आम्हाला पुणेरी पलटण संघाकडून पराभव पत्करावा लागला होता. पण यावेळी आम्ही हा निकाल बदलण्याचा प्रयत्न करू. एक चांगला सामना बघायला मिळेल, असे सांगितले. पुण्याचा टप्पा 24 डिसेंबर रोजी संपल्यानंतर येथेच 26 ते 28 डिसेंबर दरम्यान बाद फेरीचे सामने होणार आहेत. 26 आणि 27 डिसेंबर रोजी उपांत्य फेरीच्या लढती होणार आहे, त्यांपुर्वी एलिमिनिटर लढती होणार आहेत. 29 डिसेंबर रोजी येथेच अकराव्या हंगामाचा रोमहर्षक शेवट बघायला मिळणार आहे.
हेही वाचा : “आमचा संघ यावेळेस निश्चितच…”; ‘यू-मुम्बा’चा कर्णधार सुनील कुमारने ‘नवराष्ट्र’शी बोलताना व्यक्त केला विश्वास