सोलापूर : राज्यामध्ये नुकत्याच लोकसभा निवडणूका पार पडल्या. त्यानंतर आता महायुती व महाविकास आघाडीमध्ये आरोप प्रत्यारोपांचे सत्र सुरु झाले आहे. दरम्यान, सोलापुरच्या नवनिर्वाचित खासदार प्रणिती शिंदे यांनी खळबळजनक दावा केला आहे. मतदानाच्या पूर्वी सोलापूरमध्ये दंगल घडवण्याचा प्लॅन केला होता असा गंभीर आरोप खासदार प्रणिती शिंदे यांनी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला आहे.
सोलापूर लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीकडून काँग्रेस नेत्या प्रणिती शिंदे व महायुतीकडून भाजप नेते राम सातपुते यांना उमेदवारी देण्यात आली. मात्र सोलापूरमध्ये प्रणिती शिंदे यांनी विजयी गुलाल उधळला. यानंतर कृतज्ञता मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्यामध्ये प्रणिती शिंदे यांनी भाजपवर जहरी टीका केली. त्याचबरोबर सोलापूरमध्ये दंगली घडवून आणण्याचा भाजपचा डाव होता असा दावा देखील प्रणिती शिंदे यांनी केला.
काय म्हणाल्या प्रणिती शिंदे?
भाषणावेळी प्रणिती शिंदे म्हणाल्या, त्यावेळेस ते गावामध्ये जिल्ह्यात येऊन भांडण आणि दंगल लावण्याचा प्रयत्न करणार होते. त्यांच्या कानात सांगितलं गेलं होतं. मतदानाच्या दिवशी पोलिंगवर काय झालं होतं. सीपीनी सांगितलं होतं जा बाहेर नाहीतर उमेदवारावर एफआयआर करावा लागेल. त्यावेळेस भाजपवाल्यांना कळलं होतं निवडणूक आपल्या हातातून गेली आहे. आता एकच उपाय आहे दंगल लावा. निवडणुकीत लोकांमध्ये विभागणी करा आणि निवडून या असं त्यांना सांगण्यात आलं होतं. त्यांची पाच दिवस अगोदरची भाषण काढून बघा, अशा शब्दांत प्रणिती शिंदे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपवर निशाणा साधला.