'पंतप्रधान मोदींनी संविधान दिन देशभर साजरा करण्याचा निर्णय घेतला पण...'; उपमुख्यमंत्री शिंदेंचे विधान
नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानाच्या आधारे आपला देश चालतो. त्यामुळे संविधान दिनाला अत्यंत महत्त्व आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संविधान दिन देशभर साजरा करण्याचा निर्णय घेतला. पण काही लोक फक्त संविधानाचं लाल रिकामे पुस्तक हातात धरून फिरण्यातच स्वतःचं कर्तव्य संपलं असं समजतात, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या विरोधकांवर हल्लाबोल केला.
नागपूर येथे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, 26/11 हा मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा काळा दिवस होता. या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना आणि मृत्युमुखी पडलेल्या सर्व नागरिकांना मी श्रद्धांजली अर्पण करतो. तसेच ते पुढे म्हणाले, गेल्या दोन दिवसांपासून मी विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये जाऊन सभा घेत आहे. विविध नगरपालिकांमध्ये झालेल्या या सभांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. नगराध्यक्षपदाचे आमचे उमेदवार, तसेच नगरसेवकपदाचे उमेदवार सर्वांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे आहोत. विकासाचा मुद्दा घेऊनच आम्ही जनतेसमोर जात आहोत.
हेदेखील वाचा : Maharashtra Politics : महायुतीमध्ये का सुरु आहे नाराजीनाट्य? मुंबईचा महापौर कोणाचा? DCM एकनाथ शिंदेंनी स्पष्टच दिलं उत्तर
तसेच नगरपालिका आणि नगरपंचायती या नगरविकास खात्याच्या अखत्यारीत येतात. मुख्यमंत्री आणि नंतर नगरविकास मंत्री म्हणून, ज्या ठिकाणी आमचे नगराध्यक्ष नव्हते किंवा सत्ता नव्हती, अशा ठिकाणीही रस्ते, भुयारी गटार, उद्याने, आरोग्यविषयक सुविधा यासाठी मोठ्या प्रमाणावर निधी देण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त प्रत्येक नगरपरिषदेला ‘नमो उद्यान’साठी एक कोटी रुपये दिले आहेत. विकास हा आमचा मुख्य अजेंडा आहे.
मी मुख्यमंत्री असताना लाडकी बहीण योजना सुरु
ते पुढे म्हणाले, लाडकी बहिण योजना मी मुख्यमंत्री असताना सुरू केली आणि महायुती सरकारने ती पुढे नेली. ही योजना लागू करताना अनेक अडथळे आले. हे आमच्या बहिणींना चांगलेच ठाऊक आहे. पण एकदा निर्णय घेतला की ही योजना काटेकोरपणे अंमलात आणली जाईल, हे आम्ही ठामपणे सांगितले. कितीही कोणी काही म्हटलं तरी लाडकी बहिण योजना आम्ही कधीही बंद करणार नाही, याचा विश्वास आम्ही बहिणींना दिला आहे.
हेदेखील वाचा : Maharashtra Municipal Election: पालिका निवडणुकीत ‘घराणेशाही’चा कळस; शिंदे सेनेकडून एकाच कुटुंबातील सहा जणांना उमेदवारी






