मुंबई महापौर आणि महायुतीमधील नाराजीनाट्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे (फोटो - सोशल मीडिया)
Maharashtra Politics : मुंबई : राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण रंगलं आहे. पहिल्या टप्प्यामध्ये नगर परिषद आणि नगर पंचायतीच्या निवडणूका होणार आहेत. यामुळे स्थानिक पातळीवर युती तुटताना आणि नवीन समीकरणे जुळताना दिसून येत आहेत. मात्र महायुतीमध्ये वरिष्ठ पातळीवर हे नाराजीनाट्य सुरु असल्याच्या चर्चा आहेत. शिंदे गटातील अनेक नेते आणि पदाधिकारी भाजपमध्ये प्रवेश करत असल्यामुळे एकनाथ शिंदे हे नाराज असल्याचे बोलले जात आहे. यासर्व मुद्द्यावरुन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः प्रतिक्रिया दिली आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका वाहिनीशी संपर्क साधला. यावेळी त्यांनी राज्यातील राजकीय विषयांवर भाष्य केले आहे. मुंबईमध्ये कोणाचा महापौर होणार याबाबत त्यांनी माध्यमांनी प्रश्न केला. एकनाथ शिंदे म्हणाले की, “मुंबई महापालिकेत आम्ही महायुती म्हणून एकत्र लढणार आहोत. मुंबईत महायुतीची सत्ता येईल आणि महायुतीचाच महापौर होईल. कारण गेल्या निवडणुकीत निवडून आलेले जवळपास 70 नगरसेवक शिवसेनेकडे आहेत. 2012 पासूनचे काही लोक आमच्यासोबत आहेत, जवळपास 125 लोक आणच्याकडे आहेत. त्यामुळे भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीचा आगामी निवडणुकीत विजय होईल आणि महायुतीचा महापौर होईल,” असा विश्वास एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
त्याचबरोबर महायुतीमध्ये नाराजी नाट्य सुरु असून स्थानिक पातळीवर अनेक नेते हे भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. याबाबत देखील एकनाथ शिंदे यांना प्रश्न करण्यात आला. याबाबत ते म्हणाले की, “शिवसेनेचे पदाधिकारी, नेते यांचा होत असलेला भाजपा प्रवेश यावरही एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली. यावर माझी मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली आहे. काही ठिकाणी समीकरणं पाहता मुख्यमंत्र्यांनीदेखील त्यांच्या पक्षातील पदाधिकाऱ्यांना सांगितले आहे की, आपण मित्रपक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आपल्या पक्षात घेऊ नये. मीदेखील महायुतीत मतभेद निर्माण होतील, असे काहीही करू नये, असे माझ्या कार्यकर्त्यांना सांगितलंय अशी माहिती शिंदे यांनी दिली. एका ठिकाणी काँग्रेस आणि विरोधी पक्षातील पदाधिकारी शिवसेनेत प्रवेश करणार होते. त्यामुळे हे प्रवेश करणारे भाजपातील तर नाहीत ना रे बाबा, असे आवर्जुन विचारले. मित्रपक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांना शिवसेनेत प्रवेश द्यायचा नाही,” असे एकनाथ शिंदे यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
स्थानिक पातळीवरील या राजकारणावरुन नाराज झालेल्या एकनाथ शिंदेंनी दिल्लीवारी करत केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्याकडे तक्रार केल्याचे बोलले जात होते. याबाबत उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, “मी प्रचार करतोय. देवेंद्र फडणवीस, अजित पवार प्रचार करत आहेत. आम्ही प्रचारात आघाडीवर आहोत. काही ठिकाणी आमची भाजपाशी युती आहे, काही ठिकाणी अजितदादा यांच्याशी युती आहे. लोकांना स्थानिक पातळीवरील विकास पाहिजे. मैत्रीपूर्ण लढतीत एकमेकांवर टीका न करता सकारात्मक पद्धतीने, विकासात्मक प्रचार करायचा, असं आम्ही ठरवलेलं आहे, जे काही वाद होते ते आता संपलेले आहेत.मी दिल्लीत जाऊन तक्रार केली, असा काही विषय नव्हता. तक्रार करण्याचा माझा स्वभाव नाही. मला बिहारमधील शपथविधीसाठी बोलवण्यात आले होते. त्यासाठी मी दिल्लीला गेलो,” असे देखील स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे.






