मंजुषा नागपुरे होणार पुण्याच्या महापौरपदी; सोमवारी होणार अधिकृत शिक्कामोर्तब
महापालिका निवडणुकीप्रमाणेच सध्याही महाविकास आघाडीतील बेबनाव दिसुन येत आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडून महापौर पदासाठी कोणाताही उमेदवारी अर्ज दाखल केला जाणार नसल्याची माहिती होती. परंतु दोन्ही पदांसाठी अर्ज दाखल करण्यात आले. यासोबतच कॉंग्रेस पक्षाने देखील दोन्ही पदांसाठी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे सभागृहात मतदान घेवून महापौर पदाची निवड केली जाणार आहे.
नागपुरे यांची महापौरपदाची निवडणूक बिनविरोध होणार असल्याची चर्चा हाेती. मंगळवारी अर्ज भरण्याच्या िदवशी राष्ट्रवादी कॉंग्रेससह कॉंग्रेस पक्षाने दोन्ही पदांसाठी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून महापौर पदासाठी नगरसेविका शीतल सावंत आणि उप महापौर पदासाठी दत्ता बहिरट यांनी अर्ज दाखल केला आहे. तर काँग्रेसकडून महापौर पदासाठी अश्विनी डॅनियल लांडगे अाणि उपमहापौरपदासाठी साहिल केदारी यांचा उमेदवारी अर्ज भरला आहे.
महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणुक बिनविरोध होण र नाही,असे चित्र तुर्तास दिसत आहे. त्यामुळे पुणे महापालिकेच्या पहिल्या सर्वसाधारण सभेत ही निवडणूक होणार आहे. ही सभा ९ फेब्रुवारी रोजी होणार आहे. या तारखेपर्यंत तसेच सभागृहात देखील उमेदवारांना माघार घेता येते. त्यामुळे मतदान होणार की बिनविरोध निवडणूक होणार याकडे पुणेकरांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, पुणे महापालिकेवर भाजपचे ११९ नगसेवक निवडूण आले असल्याने भाजपकडे स्पष्ट बहुमत आहे. त्यामुळे नागपुरे यांचा विजय निश्चिच मानला जात आहे.
नागपुरे यांच्या निवडीची घोषणा झाल्यानंतर सिंहगड रोड परिसराला प्रथमच महापौरपदाचा मान मिळणार असून, स्थानिक पातळीवर आनंद व्यक्त केला जात आहे. सिंहगड रोड परिसरातून प्रथमच महापौरपद मिळणार असल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. मंजूषा नागपुरे यांच्या नेतृत्वाखाली शहराच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मतदानाची प्रक्रिया पार पडल्यानंतर त्या पुणे महालिकेच्या महापौरपदाची सूत्रे हाती घेतील. यापुर्वी प्रसन्न जगताप या भागातून उपमहापाैर झाले हाेते.
मंजूषा नागपुरे या सलग तिसऱ्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आल्या आहेत. यंदाच्या महापालिका निवडणुकीत त्यांनी प्रभाग क्रमांक ३४ मधून बिनविरोध विजय मिळवला होता. महापालिकेतील त्यांचा अनुभव, पक्षातील कार्य आणि संघटनात्मक कामकाजाची जाण लक्षात घेता त्यांच्या नावावर एकमत झाले. मंजूषा नागपुरे या कडव्या हिंदुत्ववादी विचारसरणी, भाजपच्या निष्ठावंत नगरसेविका म्हणून ओळखल्या जातात. महापालिकेच्या कामाच त्यांचा चांगला अनुभव आहे. स्थायी समितीसारख्या महत्त्वाच्या समितीवर त्यांनी काम केले आहे.
महापौरपदासाठी रंजना टिळेकर, वर्षा तापकीर आणि मानसी देशपांडे यांच्या नावांची चर्चा होती. योगेश टिळेकर यांना आमदारकी दिल्याने त्यांच्या मातोश्री रंजना टिळेकर यांना संधी नाकारली गेली. तर मानसी देशपांडे या आमदार, राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या भावजयी आहेत. त्यामुळे त्यांना पद देण्यात आले नसल्याची माहिती आहे. वर्षा तापकीर यांना सव्वा वर्षानंतर महापौर पद देण्याचे आश्वासन देण्यात येणार असल्याची चर्चा आहे.
महिलांना महापौरपदाची दहाव्यांदा संधी मिळणार आहे. यापूर्वी नऊ महिलांनी महापौरपदाची धुरा सांभाळली आहे. सन १९९२ मध्ये कमल व्यवहारे यांनी पुण्याच्या पहिल्या महिला महापौर होण्याचा मान मिळवला होता. काँग्रेस पक्षाकडून त्या महापौरपदी निवडून आल्या होत्या. त्यानंतर वंदना चव्हाण, वत्सला आंदेकर, दीप्ती चव्हाण, रजनी त्रिभुवन, राजलक्ष्मी भोसले, वैशाली बनकर, दिवंगत चंचला कोंद्रे आणि मुक्ता टिळक यांनी महापौर म्हणून काम केले आहे.
भाजप, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस पक्षाकडून महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. पुणे महापालिकेच्या सभागृहात मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतरच निवड प्रक्रिया पार पडणार आहे.
– योगिता भोसले, नगरसचिव, पुणे महापालिका.
पक्षीय बलाबल
भाजप : ११९
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) : २७
काँग्रेस : १५
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) : ३
उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना : ०१






