धाराशिव : राज्य सरकारकडून मराठा समाजाला शिक्षणात आणि नोकरीमध्ये 10 टक्के आरक्षण देण्यात आले असले तरी मराठा आंदोलकांनी याबाबत आनंद व्यक्त केलेला नाही. उलट मराठा आंदोलकांनी सरकारविरोधात नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धाराशिवमधील प्रत्येक गावातून एक उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे. ज्यामुळे निवडणूक आयोग आणि प्रशासनासमोर मोठा पेच निर्माण होऊ शकतो आणि याच कारणामुळे जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी निवडणूक आयोगाला विनंतीपर पत्र लिहिले आहे.
धाराशिव जिल्ह्यात 736 गावे आहेत. बार्शी व औसा या तालुक्यातील जवळपास 150 पेक्षा जास्त गावे आहेत. त्यामुळे 384 पेक्षा जास्त उमेदवार उभे राहिल्यास ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवर, मतपत्रिकावर निवडणूक घ्यावी लागण्याची शक्यता आहे. मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने आगामी लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाकडून जास्त उमेदवारी अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे. जास्त उमेदवारी अर्ज आल्यास ईवीएम ऐवजी मतपत्रिकेवर निवडणूक घ्यावी लागणार असल्याचे धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.
मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने आगामी निवडणुकीत मराठा समाजाकडून जास्त उमेदवारी अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उमेदवार वाढल्यास मतपत्रिका तितक्याच मोठ्या आकाराची होणार आहे. जास्त उमेदवारी अर्ज आल्यास ईवीएमऐवजी मतपत्रिका आणि मतपेट्याचा वापर करावा लागेल.