काँक्रिटच्या रस्त्यावर सरावाचे थर; मॅटची गरज वाढली! मातीचे मैदानच शहर आणि उपनगरातून झाले हद्दपार
बोल बजरंग बली की जय…!’, ‘बोल आई गावदेवी माते की जय !’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय….!’ ललकारीने पवईच्या गावठाणात रात्री ११ नंतर वातावरण दणाणून जाते. काही क्षणांपूर्वी काँक्रीटच्या रस्त्यावर वर्तुळ करून बसलेले गोविंदा जमिनीला हात लावून नमस्कार करतात. प्रशिक्षक सचिन मसूरकर यांची शिट्टी वाजते… ‘चल, तयार! बॉडी खाली… पकड मजबूत ठेव!’ आणि क्षणार्धात एकावर एक गोविंदांचा थर उभा राहू लागतो, मात्र या थराच्या पायाखाली मऊ माती नाही, तर कठीण काँक्रीट आहे! दहीहंडीच्या सरावासाठी मातीचे मैदानच शहर आणि उपनगरातून हद्दपार होत असल्याचे चित्र प्रकर्षाने जाणवते. पवईतील हे सराव चित्र प्रातिनिधिक मानल्यास मुंबईतील गल्लीबोळात अशाच पद्धतीने दहीहंडी फोडण्याचा सराव सुरू आहे…. तरुण गोविंदांच्या चेहऱ्यावर गोकुळष्टमीला रचल्या जाणाऱ्या थरांचा थरथराट सरावाच्या वेळीच अधिक चमकून दिसतोय.(फोटो सौजन्य – istock)
जागेची कमतरता असल्याने गोविंदा पथकांना रस्त्यावरच सरावाचा आधार घ्यावा लागत आहे. थर चढताना केवळ ताकद आणि कौशल्याचीच नव्हे, तर खाली पडताना स्वतःला सावरण्याचीही परीक्षा गोविंदांची होत आहे. ‘घाई नको… कमांड ऐकून मूव्ह करा… सेफ्टी फर्स्ट!’ प्रशिक्षक अधूनमधून दम देतो. एखादा गोविंदा डळमळला की क्षणभर सगळ्यांची धावपळ होते. सरावादरम्यान एका गोविंदाला दुखापत झाल्याने त्याच्यावर सध्या केईएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यामुळे सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
सरावासाठी मॅट वापरण्याच्या सूचना आहेत, मात्र मुंबईतील छोट्या गोविंदा पथकांसमोर वेगळीच अडचण आहे. मॅट भाड्याने घेण्याचा किंवा विकत घेण्याचा खर्चही अनेक पथकांना परवडत नाही. त्यामुळे सुरक्षित सरावाची गरज आणि आर्थिक वास्तव यांच्यात त्यांची कोंडी झाली आहे. असे असले मुंबईतील पथकांचा सराव थांबलेला नाही. गोकुळाष्टमीपर्यंत तो सुरूच राहणार आहे.
66 दहीहंडी हा गल्लीबोळातील सण आहे. मैदान कमीच झालीत. अशा वेळी पथक इमारती खाली किंवा रस्त्यावर सराव करतात, ज्या पथकांची क्षमता आहे असे पथक सरावासाठी मॅट घेतात. मात्र मॅट असो नसो आम्ही आमच्या माध्यमातून काळजी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. उत्सवाला कुठेही गाल बोट लागू नये, अशी माहिती कमलेश भोईर, दहीहंडी समन्वय समिती यांनी दिली आहे.






