पंढरपूर तालुक्यात येणाऱ्या सर्व मार्गावर व शहरात स्वागत मंडप, कमान घालण्यास प्रतिबंध (Photo : File Photo)
पंढरपूर : आषाढी शुद्ध एकादशी सोहळा 6 जुलैला असून, यात्रा कालावधी 26 जून ते 10 जुलै असा आहे. आषाढी यात्रा सोहळ्यानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी राज्याच्या विविध जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात भाविक एसटी बसने येत असतात. एसटी बसने येणाऱ्या भाविकांना आवश्यक सोयी सुविधा देण्यासाठी भीमा बस स्थानक येथे पाच हजार चौरस फुटाचे तीन वॉटरप्रूफ मंडप व ३०० सुलभ शौचालय उपलब्ध करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली.
जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद म्हणाले, ‘आषाढी यात्रा कालावधीसाठी एसटी बसने प्रवास करणाऱ्या भाविकांसाठी तात्पुरते चार बस स्थानक उभारले जातात. भीमा बस स्थानक येथे छत्रपती संभाजीनगर, नागपूर व अमरावती लांब पल्ल्याच्या बसेस या विभागातून येतात. भीमा बस स्थानक येथे बसेसने येणाऱ्या भाविकांसाठी जिल्हा परिषदेकडून ५ हजार चौरस फुटाचे तीन वॉटरप्रूफ मंडप, तसेच २२५ सुलभ शौचालय व राज्य परिवहन महामंडळाकडून ७५ शौचालय उभारण्यात येणार आहेत. त्याचबरोबर बस स्थानकावर मुबलक पाणीपुरवठा, स्वच्छता आदी सुविधा एसटी महामंडळाने भाविकांसाठी उपलब्ध कराव्यात, अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत.
28 जूनपासून नवीन बस स्थानक राहणार बंद
आषाढी यात्रेसाठी पालखी सोहळ्यासोबत येणाऱ्या दिंड्यांना तसेच वारकरी, भाविकांना वाहतुकीचा कोणताही त्रास होऊ नये. तसेच वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी यासाठी पंढरपूर येथे सुरू असलेले नवीन बस स्थानक 28 जूनपासून यात्रा कालावधी संपेपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले आहेत.
लवकरच आषाढी वारी सुरु होणार
लवकरच आषाढी वारी सुरु होणार आहे. याच पार्श्वभूमीवर देहू आणि आळंदीसह पालखीमार्गाची डागडुजी केली जात आहे. मात्र, वैष्णवांचा मेळा जमत असलेल्या पंढरपूर शहरातील रस्त्यांची मात्र अत्यंत बिकट अशी अवस्था झाली आहे. पावसाळा सुरू होताच या रस्त्यांची चाळण झालेली पाहायला मिळत आहे. खोदकामानंतर वेळेत दुरुस्ती न केल्यामुळे आणि ऐन पावसात डांबरीकरणाचे घेतलेले काम पावसामुळे वाहून गेल्याने नागरिकांचा त्रास अधिकच वाढला आहे.