फोटो - टीम नवराष्ट्र
कोल्हापूर : आज सर्वत्र शिक्षक दिन साजरा केला जात आहे. मात्र कोल्हापूरमध्ये शिक्षक रस्त्यावर उतरले आहेत. विनाअनुदानित शिक्षकांनी अनुदानासाठी आक्रमक पवित्रा घेतला आहे. राज्यातील 63 हजार शिक्षकांचा जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या वाढीव टप्प्याचा जीआर काढावा आणि अनुदान द्यावे तसेच 15 मार्च, 2024 चा संचमान्यतेचा जाचक आदेश रद्द करावा, अशी मागणी त्यांची आहे. यासाठी विनाअनुदानित कृती समितीच्या वतीने एक ऑगस्ट पासून शिक्षण उपसंचालक कार्यालय कोल्हापूर येथे बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येत आहे. मागील अकरा दिवसापासून या शिक्षकांचे उपोषण सुरू आहे. कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाने विनाअनुदानित कृती समितीच्या आंदोलनाला एकमुखाने पाठिंबा दिला.
शिक्षकदिनी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व शाळा बंद ठेवून विनाअनुदानित कृती समितीच्या शिक्षक संघटनेला सर्वांनी पाठिंबा दिला. कोल्हापूर येथील ऐतिहासिक दसरा चौकात शिक्षक संघटना आणि शिक्षकांनी मूक मोर्चा काढत रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी विनाअनुदानित, अंशतः अनुदानित अघोषित शिक्षक-शिक्षिकांनी आपल्या व्यथा मांडल्या आहेत. शिक्षकांचे प्रश्न सोडवावेत अन्यथा पुढील आठवड्यात पुणे-बेंगलोर महामार्ग बंद करून चक्का जाम करण्यात येईल, असे उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे यांनी सांगितले.
या आंदोलनावर आमदार आसगावकर म्हणाले, “2016पासून राज्यातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी अल्पवेतनावर काम करत आहेत. राज्यात अंशतः अनुदानित, विनाअनुदानित, व अघोषित प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांवर हजारो शिक्षक गेल्या वीस वर्षांपासून पवित्र ज्ञानदानाचे काम करीत आहेत. यामध्ये काही माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी २० टक्के व ४० टक्के ६० टक्के अनुदानानुसार वेतन घेत आहेत. हा प्रश्न सोडविणे गरजेचे आहे,” असे मत आमदार आसगावकर यांनी मांडले.
मोर्चाला परवानगी नाकारली
पुणे बेंगलोर महामार्गावर मोर्चा जाणार होता, परंतु व्हीआयपी व्यक्तींचे कोल्हापुरात आगमन होणार असल्याने पोलिसांनी परवानगी नाकारत दसरा चौकात आंदोलन करावे, अशी विनंती केली. त्यानुसार या ठिकाणी आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्ह्यासह परजिल्ह्यातील, राज्यातील हजारो शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, महिलांची संख्या लक्षणीय होती.
प्रचलित धोरणानुसार वेतन द्या
दिवसेंदिवस महागाई वाढत असल्याने शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना महिन्याला मिळणाऱ्या तुटपुंज्या पगारावर साधा घर खर्च देखील भागत नाही. राज्य सरकारने या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देऊन शिक्षक वर्गाचे प्रश्न सोडवून पूर्वीच्या प्रचलित धोरणानुसार वेतन द्यावे, अशी मागणी आमदार जयंत आसगावकर, दादासाहेब लाड यांनी केली. त्या दृष्टीने सरकार दरबारी प्रयत्न केले जातील, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
उपोषण आपण तात्पुरते मागे
शैक्षणिक व्यासपीठ, तमाम शिक्षक संघटना, सर्व विनाअनुदानित शिक्षक बांधव, खासदार धैर्यशील माने यांच्या विनंतीनुसार जगदाळे यांच्यासह तिघांनी उपोषण सोडले. धैर्यशील माने यांच्या वतीने संदेश घेऊन शीतल खोत आले होते. शिक्षणमंत्र्यांनी ८ दिवसात बैठक होऊन आदेश काढला जाईल, असा निरोप खासदार धैर्यशील माने यांनी दिला असल्याचे खोत यांनी सांगितले. उपोषण आपण तात्पुरते मागे घेतले असले तरी धरणे आंदोलन सुरूच राहणार असल्याचे ही जगदाळे यांनी सांगितले.






