उरुळी देवाची आणि फुरसुंगी गावांसाठी स्वतंत्र नगरपरिषदेचा मार्ग अखेर मोकळा (Photo Credit- Social Media)
पुणे : महापालिकेचे अंदाजपत्रक सलग चौथ्यावर्षी मार्च महिन्यात सादर होणार, अशी चर्चा सुरु झाली आहे. जानेवारी महिन्यात हे अंदाजपत्रक सादर करणे आवश्यक असताना प्रशासकीय कालावधीत गेल्या तीन वर्षात मार्च महिन्यात सादर केले गेले. महापालिकेच्या विविध भांडवली कामे, वॉर्डस्तरीय कामे, महत्वाकांक्षी प्रकल्प आदीबरोबरच वेतन खर्च आदी तसेच उत्पन्न आदीचा ताळमेळ घालणारे हे अंदाजपत्रक हे शहराच्या विकासाची दिशा दाखविणारे असते.
हेदेखील वाचा : Ladki Bahin Yojana : अपात्र बहीणींचा सरकारच्या तिजोरीवर डल्ला; तब्बल ‘इतक्या’ कोटींचा बसला राज्य सरकारला फटका
लोकप्रतिनिधी असताना, प्रथम महापालिका प्रशासन (आयुक्त) हे अंदाजपत्रक तयार करून ते स्थायी समितीला सादर करतात. स्थायी समितीमध्ये या अंदाजपत्रकावर चर्चा होऊन आणखी तरतूदी केल्या जातात. यामध्ये वॉर्डस्तरीय कामांचा समावेश असतो. तसेच सत्ताधारी पक्षाच्या धोरणाचे प्रतिबिंबही या अंदाजपत्रकात पडत असते. महापालिकेच्या नगरसेवकांची मुदत संपल्यानंतर गेल्या चार वर्षांपासून प्रशासक म्हणून आयुक्त काम पाहत आहे. पहिले तीन वर्ष तत्कालीन आयुक्त विक्रम कुमार यांनी अंदाजपत्रक सादर केले.
महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत झालेल्या ठरावानुसार महापालिका आयुक्तांनी १५ जानेवारीपर्यंत स्थायी समितीला हे अंदाजपत्रक सादर करणे बंधनकारक आहे. परंतु, यावर्षी हे अंदाजपत्रक १५ जानेवारीनंतर सादर करण्यास मुदतवाढ द्यावी असा प्रस्ताव स्थायी समितीसमोर ठेवला गेला होता. त्यास मंजुरी मिळाली आहे. आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले आता कधी अंदाजपत्रक स्थायी समितीला सादर करणार? याकडे लक्ष लागले आहे.
कोणत्या कामांना मिळणार प्राधान्य?
गेल्या महिन्यात आयुक्तांनी सर्व विभागप्रमुखांकडून अंदाजपत्रकासंदर्भातील प्रस्ताव मागविले होते. त्यानुसार सर्व विभागांनी प्रस्ताव सादर केले. महापालिकेच्या हद्दीत नव्याने समाविष्ट गावांतील नागरी सुविधांचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर निर्माण झाला आहे. या गावांतील रस्ते, ड्रेनेज, पाणी पुरवठा आदी कामे मोठ्या प्रमाणावर करावी लागणार आहे. त्यासाठी भरीव तरतूद २०२५-२६ च्या अंदाजपत्रकात असेल का ? याची उत्सुकता निर्माण झाली आहे.
हेदेखील वाचा : “ते जनतेने निवडून दिलेले मुख्यमंत्री…टीका करताना संयम…”; मनोज जरांगे पाटलांना उदय सामंताचा खास सल्ला