फोटो सौजन्य - सोशल मीडिया
पुणे : पुण्यनगरीमध्ये आज संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगदगुरू तुकाराम महाराज यांच्या पालखींचे आगमन होणार आहे. त्यांच्यासोबत लाखो वारकरी व हजारो दिंड्या देखील पुण्यामध्ये दाखल होत आहे. यासाठी शहर सज्ज होत असून पुणे पोलिसांनी देखील जय्यत तयारी केली आहे. पालखी सोहळ्यानिमित्त शहर पोलिसांनी तगडा बंदोबस्त तैनात केला आहे. पाच हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. याशिवाय ठिकठिकाणी सीसीटीव्ही, वॉच टॉवर राहणार असून गर्दीच्या ठिकाणी गुन्हे शाखेची खास पथके गस्त घालणार आहेत. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्ताची आणखी करण्यात आली आहे.
देहूनगरी येथून तुकाराम महाराज यांची पालखी शुक्रवारी तर ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे काल शनिवारी प्रस्थान झाले. या दोन्ही पालख्या आज शहरात दाखल होत आहे. रविवारी आणि सोमवारी शहरात मुक्कामी असणार आहेत. मंगळवारी (दि.२५) पालखी सोहळा पुढे मार्गस्थ होणार आहे. नाना पेठेतील श्री निवडु्ंग्या विठोबा मंदिर येथे श्री तुकाराम महाराज यांची पालखी मुक्कामी असेल तर भवानी पेठेतील श्री पालखी विठोबा मंदिरात श्री ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा मुक्कामी असणार आहे. यामुळे शहरातील मध्यवर्ती भागातील वाहतूकीमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे.
मोठा फौजफाटा तैनात
पालखीसोबत वारकऱ्यांसोबतच लाखो भाविक जमा होतात. शहरात दाखल झाल्यापासून मुक्कामाच्या ठिकाणापर्यंत मोठी गर्दी होत असते. या गर्दीचा चोरट्यांकडून फायदा घेतला जातो. महिलांच्या तसेच तरुणांच्या गळ्यातील सोने हिसकावून नेले जाते. त्यानिमित्ताने पोलिसांनी तगडा बंदोबस्त तैनात केला आहे. विशेषतः मुक्कामाच्या ठिकाणी मोठा फौजफाटा ठेवला आहे. पोलिसांनी पालख्यांच्या आगमन ते पालख्या शहराबाहेर मार्गस्थ होईपर्यंत नियोजन केले आहे. वाहतुकीसाठी स्वतंत्र पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. पालखी सोहळा दृष्टीक्षेपात असेपर्यंत पोलिसांचा पालखी सोहळ्याला बंदोबस्त असणार आहे. यामध्ये 2 अप्पर पोलीस आयुक्त तसेच 10 पोलीस उपायुक्त असणार आहेत. त्याचसोबत 20 सहायक पोलीस आयुक्त व 101 पोलीस तसेच 343 सहायक निरीक्षक व उपनिरीक्षक निरीक्षक कार्यरत असणार आहे. त्याच्यासोबत सुरक्षिततेसाठी तबब्ल 3हजार 693 पोलीस कर्मचारी आणि 800 होमगार्ड असणार आहे. राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्या देखील तैनात करण्यात आल्या आहेत.
गुन्हे शाखेची खास पथके
पालखी सोहळ्यातील गर्दीचा गैरफायदा घेत चोरटे भाविकांकडील ऐवज चोरी करतात. सोनसाखळी चोरी, मोबाइल चोरी रोखण्यासाठी गुन्हे शाखेतील पोलिसांची पथके साध्या वेशात गस्त घालणार आहे. यासाठी गुन्हे शाखेतील खास बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.