पुणे आरटीओ 'मालामाल'; 2025-26 मध्ये तब्बल 1922 कोटींची वसुली, महसूलात मोठी वाढ
पुणे : प्रादेशिक परिवहन कार्यालय पुणे (आरटीओ) सन 2025-26 मध्ये 1922 कोटी रुपये महसूल वसूल केला असून, राज्य शासनाकडून पुणे आरटीओला मोटार वाहन कर व शुल्क याकरिता १८९५.१७ कोटींचे उदिष्टे देण्यात आले होते. आरटीओला दिलेल्या महसूल वसूलीचे उदिष्टे १०१.४२ टक्के पूर्ण झाले.
यामध्ये रस्ता सुरक्षा अंमलबजावणी पथकांद्वारे तपासणीमध्ये दोषी आढळलेल्या एकूण १६ हजार ५०१ वाहनांना ई-तपासणी अहवालाव्दारे जारी करण्यात आली. यातून २५ कोटी ६८ लाख रुपये महसूल वसूल करण्यात आले. तसेच कार्यालयामार्फत एकूण १ लाख ८६ हजार ८२४ वाहन चालक परवाना जारी करण्यात आले असून, ५ हजार ५८४ आंतरराष्टीय वाहन परवाने देण्यात आले.
मोटार वाहनांच्या थकीत करातून ३२ कोटी २३ लाख रुपये महसूल वसूल करण्यात आले आहे. तर थकीत पर्यावरण करातून ९ कोटी ८० लाख रुपये महसून वसूल करण्यात आले. ई-लिलावाव्दारे १९३ वाहनाच्या विक्रीमधून १ कोटी ६ लाख रुपये महसूल मिळाले आहे. तसेच ११ कोटी १८ लाख ८४४ इतक्या वाहनांना एचएसआरपी नंबर प्लेट कार्यवाही करण्यात आली आहे.
3.45 लाख नवीन वाहनांची नोंदणी
सन २०२५-२६ या कालावधीत ३ लाख ४५ हजार ५४३ नवीन वाहने नोंदविण्यात आली आहेत. शिवाय या कालावधीत ५६.१७२ पसंती क्रमांक आरक्षित करण्यात आले. यामधून ७३ कोटी ७६ हजार रुपयांचा महसूल मिळाला आहे.
१८७ वाहनांचा ई-लिलाव
मोटार वाहन कर न भरलेल्या तसेच मोटार वाहन कायद्यातील विविध गुन्ह्यांमध्ये जप्त केलेल्या १८७ वाहनांचा ई-लिलाव गेल्या दोन वर्षात करण्यात आले आहे. या लिलावातून प्रादेशिक परिवहन कार्यालय पुणे आरटीओला १ कोटी १ लाख ८९ हजार ३४६ रूपये महसूल मिळाले आहे, अशी माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्निल भोसले यांनी दिली आहे.






