सौजन्य - सोशल मिडीया
पुणे : चाकण औद्योगिक वसाहतीवरील वाढता ताण कमी करण्यासाठी मावळ तालुक्यातील बऊर, करंज आणि ब्राह्मणवाडी या तीन गावांमध्ये सुमारे १,१०० एकर क्षेत्रावर नवीन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची (एमआयडीसी) वसाहत विकसित करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. प्रस्तावित क्षेत्राचे प्राथमिक सर्वेक्षण आणि जमिनीची मोजणी पूर्ण झाली असून, जमिनीच्या दरनिश्चितीला राज्य सरकारची मंजुरी मिळाल्यानंतर प्रत्यक्ष भूसंपादन प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. येत्या दोन ते तीन महिन्यांत भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण करण्याचे प्रशासनाचे नियोजन असल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली.
प्रस्तावित औद्योगिक क्षेत्रासाठी बऊर येथे सुमारे ८७ हेक्टर, करंज येथे १३५ हेक्टर आणि ब्राह्मणवाडी येथे १८३ हेक्टर जमीन प्रस्तावित करण्यात आली आहे. या तिन्ही गावांमधील जमिनींचे प्राथमिक सर्वेक्षण आणि मोजणी पूर्ण करण्यात आली असून, एमआयडीसीकडून भूसंपादनाचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविण्यात आला आहे. त्याचबरोबर जमिनीच्या दरनिश्चितीचा प्रस्तावही शासनाकडे सादर करण्यात आला आहे. दरनिश्चितीला शासनाची मंजुरी मिळताच भूसंपादनाची प्रत्यक्ष प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. प्रक्रिया वेगाने पूर्ण करून नवीन औद्योगिक क्षेत्राच्या विकासाला चालना देण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे.
चाकणवरील ताण कमी होणार
पुणे-मुंबई द्रुतगती मार्गासह प्रमुख महामार्गांच्या जवळ प्रस्तावित औद्योगिक क्षेत्र असल्याने वाहतुकीच्या दृष्टीने या परिसराला मोठे महत्त्व प्राप्त होणार आहे. चाकण एमआयडीसीमध्ये वाढती वाहतूक कोंडी, पायाभूत सुविधांवरील वाढता ताण आणि औद्योगिक विस्तारासाठी उपलब्ध जागेची कमतरता या पार्श्वभूमीवर मावळ तालुक्यात उद्योगांसाठी पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. नव्या एमआयडीसीमुळे चाकण औद्योगिक पट्ट्यावरील पायाभूत सुविधा आणि वाहतुकीवरील ताण कमी होण्यास मदत होणार आहे. तसेच नवीन उद्योग, गुंतवणूक आणि स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मितीच्या संधी वाढण्याची अपेक्षा आहे.
पाबळमध्येही एमआयडीसीचा प्रस्ताव
दरम्यान, शिरूर तालुक्यातील पाबळ येथेही सुमारे ७०० हेक्टर क्षेत्रावर नवीन एमआयडीसी विकसित करण्याचा प्रस्ताव आहे. या प्रस्तावित क्षेत्राची जमिनीची मोजणी लवकरच करण्यात येणार असून, त्यानंतर भूसंपादनासह पुढील प्रशासकीय प्रक्रियेला गती देण्यात येणार आहे. मावळ आणि शिरूर तालुक्यात प्रस्तावित असलेल्या या औद्योगिक क्षेत्रांमुळे पुणे जिल्ह्यातील औद्योगिक विस्ताराला नवी दिशा मिळण्याबरोबरच चाकण औद्योगिक परिसरावरील वाढता ताण कमी होण्यास मदत होण्याची शक्यता आहे.






