
फोटो सौजन्य सोशल मीडिया
त्यांच्या निधनाने बारामतीच्या सार्वजनिक जीवनातील एक महत्त्वाचा चेहरा हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार आणि दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विश्वासू सहकारी म्हणूनही त्यांची ओळख होती. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातून शोक व्यक्त करण्यात येत आहे.
जवाहर शाह यांनी अनेकांत एज्युकेशन सोसायटीचे सचिव म्हणून दीर्घकाळ काम पाहिले. त्यानंतर संस्थेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर त्यांनी शैक्षणिक विस्तारासाठी विशेष प्रयत्न केले. त्यांच्या नेतृत्वाखाली संस्थेच्या शैक्षणिक कार्याला व्यापक दिशा मिळाली. बारामतीसह परिसरातील विद्यार्थ्यांना विविध अभ्यासक्रमांच्या माध्यमातून शिक्षणाच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा राहिला.
अनेकांत एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय, जयसिंगपूर येथील वरिष्ठ महाविद्यालय, अनेकांत इंग्लिश मीडियम स्कूल तसेच कनिष्ठ आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम चालविले जातात. याशिवाय बी. फार्मसी, डी. फार्मसी, एमबीए, वृत्तपत्रविद्या आणि फूड टेक्नॉलॉजी यांसारखे विविध अभ्यासक्रम संस्थेत उपलब्ध आहेत. या शैक्षणिक संस्थांच्या विस्तारात आणि प्रगतीत शाह यांचे योगदान महत्त्वपूर्ण मानले जाते.
Financial Crisis: शब्दांचे सोने करणारा कवी आर्थिक विवंचनेत; पत्नीच्या उपचारांसाठी कर्जाचा डोंगर
शिक्षण क्षेत्रासोबतच जवाहर शाह यांनी सार्वजनिक जीवनातही सक्रिय भूमिका बजावली. बारामती नगरपालिकेचे नगराध्यक्ष म्हणून त्यांनी शहराच्या विकासकामांमध्ये योगदान दिले. तसेच बारामती मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून व्यापारी वर्गाचे प्रश्न आणि हितसंबंध मांडण्याचे काम केले. जैन समाजाच्या धार्मिक आणि सामाजिक उपक्रमांमध्येही त्यांचा सक्रिय सहभाग होता. विविध क्षेत्रांतील कामामुळे बारामतीमध्ये त्यांचा मोठा जनसंपर्क होता.
ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याशी जवाहर शाह यांचे अनेक वर्षांपासून निकटचे संबंध होते. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशीही त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच शरद पवार, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी दुःख व्यक्त केले.
त्यांच्या जाण्याने बारामतीच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात नगरसेवक राहुल वाघोलीकर, दोन विवाहित मुली, सून आणि नातवंडे असा परिवार आहे.