पुण्यात पावसाचा जोर वाढला (फोटो- सोशल मीडिया)
पुणे: पुणे जिल्हा आणि शहराला पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. दरम्यान अजूनही पुण्यात मुसळधार पाऊस सुरूच आहे. धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असल्याने खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास हा विसर्ग 2000 क्युसेक इतका होता. तर पावसाचा जोर वाढल्याने धरणातून आता 4,345 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आल्याने मुठा नदीच्या पाणी पातळीत देखील वाढ झाली आहे. पुण्यातील प्रसिद्ध असा बाबा भिडे पूल देखील पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. खडकवासला धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे.
पुण्यात जोरदार पाऊस सुरू असल्याने अनेक भागात पाणी साचले आहे. कात्रज, धनकवडी, सिंहगड रस्ता या भागात पाणी साचल्याने वाहतुकीवर काही अंशी परिणाम झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. तसेच काही घरांमध्ये देखील पाणी शिरल्याने नागरिकांचे नुकसान झाले आहे.
नदीपात्रात नागरिकांनी उतरू नका, नदीकाठच्या लोकांनी सतर्कता बाळगा असे आवाहन प्रशासनाने केले आहे. पावसाचा जोर खडकवासला धरण क्षेत्रात कायम राहिल्यास धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला जाण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागानेही पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज वर्तवला आहे.
पुणे शहर आणि उपनगर परिसरात या आठवड्यात हलक्या ते माध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे पुणे महानगरपालिकेने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान पावसाचा जोर कायम असल्याने पुणे शहरातील वाहतुकीवर देखील परिणाम झाला आहे. वाहतूक संथ गतीने सुरू आहे. भारतीय हवामान विभागाकडून (IMD) देण्यात आलेल्या अंदाजानुसार पुढील २४ तासाकरिता मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे, अशी माहिती राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून देण्यात आली.
तसेच ठाणे, मुंबई उपनगर, मुंबई शहर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग सागरी किनारपट्टीसाठी उच्च लाटांचा इशारा देण्यात आला आहे. हा इशारा 18 जूनला सायंकाळी 5:30 वाजल्यापासून ते 19 जूनला रात्री 11:30 वाजेपर्यंत देण्यात आला असून या कालावधीत समुद्रात 3.5 ते 3.8 मीटर उंच लाटा येण्याची शक्यता आहे. या दरम्यान समुदामध्ये लहान बोटींना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. किनारपट्टीजवळील पर्यटन व जलक्रीडा पूर्णतः थांबवण्याचाही ईशारा देण्यात आला आहे, अशी माहिती राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून देण्यात आली.