यवत : ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ चित्रपटाची आठवण करून देणाऱ्या या प्रकाराने दौंड तालुक्यातील भरतगांवात एकच खळबळ उडाली आहे. तालुक्यात अनेक गावांत आरोग्य विभागाच्या आशीर्वादाने सर्रासपणे बोगस डॉक्टर रुग्णांवर उपचार करीत आहे. तालुक्यात बोगस बंगाली डॉक्टरवर अद्यापपर्यंत मोठी कारवाई करण्यात आली नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
शासकीय आरोग्याची सेवा समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचत नसल्याने, त्याचा गैरफायदा बोगस बंगाली डॉक्टरांकडून घेतला जातो आहे. अनेक दिवसांपासून तालुक्यातील अनेक ठिकाणी ग्रामीण भागात आपला चांगलाच जम बसवला आहे. यामुळे सर्वसामान्य, अशिक्षित लोकांच्या जीवावरच बेतत आहे. तर दुसरीकडे यासंदर्भात आरोग्य विभागाकडून कुठल्याही प्रकारची कठोर कारवाई होत नसल्याने त्यांचे फावले आहे.
कुठलीही नोंदणी अथवा परवाना नसताना बोगस डॉक्टरकडून रुग्णांवर उपचार केले जात आहेत. साध्या आजाराच्या रुग्णांना आरामही पडतो. मात्र, अतिगंभीर आजाराचा रुग्ण असल्यास हे डॉक्टर त्याला इतर रुग्णालयांत पाठवून देतात. हा व्यवसाय करताना अंगलट येण्यासारखे काही प्रकरण घडल्यास ते बाहेरच्या बाहेर मिटवले जावे, यासाठी बोगस डॉक्टरांकडून सर्रास स्थानिक पुढारी किंवा सामाजिक कार्यकर्ते यांना हाताशी धरले जाते.
परवानगी नाही
ग्रामपंचायत भरतगांवकडून कोणत्याही प्रकारची या डॉक्टरांना परवानगी देण्यात आली नाही, अशी माहिती ग्रामविकास अधिकारी विजय भंडारे यांनी दिली.
बोगस डॉक्टर आढळल्यास संपर्क करा
दौंड तालुक्यातील कोणत्याही गावात अशा प्रकारचे बंगाली बोगस डॉक्टर आढळून आल्यास ताबडतोब वैद्यकीय अधिकारी यांच्याशी संपर्क करावा. तत्काळ कारवाई करण्यात येईल.
– सुरेखा पोळ, वैद्यकीय तालुका अधिकारी.