मराठा आणि OBC आरक्षणावरून मुख्यमंत्र्यांची स्पष्ट भूमिका
Yala Saswad/Sambhaji Mahamuni: मराठा आरक्षणावरून सध्या सुरू असलेल्या वादविवादाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. “दोन समाजांना एकमेकांमध्ये भांडणे लावायची आमची नीती नाही. एकाच्या ताटातील काढून दुसऱ्याच्या ताटात टाकणार नाही,” असे सांगत मराठा आरक्षणात ओबीसी समाजाचे कोणतेही नुकसान होणार नाही, याला प्राधान्य दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पुरंदर तालुक्यातील भिवडी येथे आयोजित आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक जयंती सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी रामोशी समाजासाठी अनेक महत्त्वपूर्ण घोषणा केल्या. राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळाकडून २ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज कोणतेही तारण न घेता दिले जाईल, तर १५ लाख रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी कोणतेही व्याज आकारले जाणार नाही. “पुढील काळात नोकरी मागणारे नाही, तर नोकऱ्या देणारे बना,” असे आवाहन करत त्यांनी रामोशी महामंडळाला तरुणांना पोलिस भरतीचे प्रशिक्षण देण्याची योजना तयार करण्याचे निर्देश दिले. यामुळे समाजातील तरुण-तरुणींना पोलीस सेवेत दाखल होऊन उमाजी नाईक यांचे कार्य पुढे नेता येईल, असे ते म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज भिवडी, ता. पुरंदर, जि. पुणे येथे ‘आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचा 234 वा शासकीय जयंती सोहळा’ कार्यक्रमस्थळी ‘राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळा’द्वारे निर्मित कक्षाचे उदघाटन करत, महामंडळाच्या विविध योजनांच्या माहिती फलकांचे अवलोकन… pic.twitter.com/ccAiDHzKrh
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) September 7, 2025
मराठा आरक्षणासंदर्भात बोलताना मुख्यमंत्र्यांनी मराठवाड्यातील कुणबी नोंदींवरही स्पष्टीकरण दिले. “मराठवाड्यात इंग्रजांचे नव्हे, तर निजामाच्या शासन होते. त्यामुळे इंग्रजांचे रेकॉर्ड उपलब्ध नाही. म्हणून आम्ही ‘हैदराबाद गॅझेट’चा आधार घेतला आहे. ज्यांच्याकडे गॅझेटचा पुरावा असेल आणि ज्यांची नोंद असेल, त्यांनाच कुणबी प्रमाणपत्र मिळेल,” असे त्यांनी सांगितले. यामुळे सरसकट प्रमाणपत्रे दिली जाणार नसल्याचे स्पष्ट झाले.
आमदार गोपीचंद पडळकर यांनीही यावर बोलताना, “आमचा ओबीसी समाजावर विश्वास आहे. तुम्ही आमचे हक्क सुरक्षित ठेवा, आम्ही तुमचा गड राखतो,” असे सांगत मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेवर विश्वास व्यक्त केला.
या सोहळ्यात बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. पूर्वीच्या काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारने उमाजी नाईक यांची शासकीय जयंती साजरी केली नाही, असा आरोप शिवेंद्रराजे यांनी केला. “आज मराठा आणि ओबीसी समाजाचे खरे नेते देवेंद्र फडणवीस आहेत,” असे सांगत, त्यांनी आंदोलनामुळे घाबरून न जाण्याचे आवाहन केले. या सोहळ्याचे आयोजन जय मल्हार क्रांती संघटनेने केले होते. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दौलत शितोळे यांनी राजे उमाजी नाईक स्मारकाचा विकास आराखडा सादर केला आणि आर्थिक महामंडळातून मिळणाऱ्या कर्जाची मर्यादा वाढवण्याची मागणी केली.