"दादा बायरोड पुण्याला जाणार होते, पण..."; अपघातापूर्वी नेमकं काय घडलं? चालकाने सांगितला 'तो' थरार (Photo Credit- X)
ड्रायव्हर श्यामराव मनवे यांनी सांगितले की, २७ जानेवारी रोजी मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक होती. ही बैठक उशिरापर्यंत चालली. “आमचा पूर्वनियोजित बेत असा होता की, आम्ही त्याच रात्री ‘बायरोड’ (रस्तेमार्गे) मुंबईहून बारामतीला निघणार होतो. मात्र, बैठकीला खूप उशीर झाला. दादांना विश्रांतीची गरज होती आणि सकाळी लवकर बारामतीला पोहोचणेही गरजेचे होते. त्यामुळे उशीर झाल्यामुळे त्यांनी गाडीने प्रवास न करण्याचा निर्णय घेतला,” असे मनवे यांनी स्पष्ट केले.
सकाळी लवकर पोहोचण्याच्या उद्देशाने अजितदादांनी चार्टर्ड विमानाने जाण्याचा निर्णय घेतला. २८ जानेवारीच्या सकाळी ८ वाजता ते विमानात चढले आणि काही वेळातच ही भीषण दुर्घटना घडली. “दादा पहिल्यांदा मंत्री झाले तेव्हापासून मी त्यांच्यासोबत आहे. ते आता आपल्यात नाहीत, यावर आमचा अजूनही विश्वास बसत नाहीये,” अशा शब्दांत मनवे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
अजितदादांच्या स्वभावाबद्दल बोलताना मनवे म्हणाले की, “लोकांना दादा कडक वाटायचे, पण ते मनातून खूप वेगळे होते. त्यांनी नेहमी प्रत्येकाला मदत केली.” राजकारणावर भाष्य करणे टाळले असले तरी, श्यामराव मनवे यांनी एक मोठी इच्छा व्यक्त केली. “दादांच्या जागी आता सुनेत्रा ताईंना उपमुख्यमंत्री म्हणून नियुक्त करावे, ही केवळ माझीच नाही तर सर्व कार्यकर्त्यांची इच्छा आहे,” असे त्यांनी नमूद केले.
गुरुवारी बारामतीतील काटेवाडी येथील विद्या प्रतिष्ठान मैदानावर अजित पवार यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी शरद पवार, सुप्रिया सुळे, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह लाखो कार्यकर्ते उपस्थित होते. या विमान अपघातात अजितदादांसह दोन पायलट, एक सुरक्षा रक्षक आणि एक महिला क्रू मेंबर अशा एकूण पाच जणांचा मृत्यू झाला आहे.






