
वाहतूक कोंडीवरील तातडीच्या उपाययोजनांना प्राधान्य द्या; विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले यांचे निर्देश
पुणे : पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि पुणे महानगर प्रदेशातील वाहतुकीचे दीर्घकालीन एकात्मिक नियोजन सुरू असतानाच सध्याची वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी तात्काळ राबविता येतील अशा उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी प्राधान्याने करावी, असे निर्देश विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले यांनी दिले. विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित ‘पुणे एकीकृत महानगर परिवहन प्राधिकरण’ (UMTA) समितीच्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या.
बैठकीला महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर (दूरदृश्य प्रणालीद्वारे), पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त अभिजीत चौधरी, अतिरिक्त आयुक्त मंजुलक्ष्मी के., पुणे महापालिकेच्या अपर आयुक्त पवनीत कौर, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
श्रीमती तेली-उगले म्हणाल्या की, पुणे शहरातील प्रस्तावित बोगद्यांचे जाळे अर्थात ‘पाताळ लोक प्रकल्प’, उच्च क्षमता द्रुतगती मार्ग (एचसीएमटीआर) आणि अंतर्गत वर्तुळाकार मार्ग यांसारख्या दीर्घकालीन प्रकल्पांसाठी विशेष प्रयोजन वाहन (एसपीव्ही) कंपनी स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली आहे. हे प्रकल्प प्रत्यक्षात येण्यासाठी कालावधी लागणार असल्याने त्यांचे नियोजन, आरेखन आणि विस्तृत प्रकल्प अहवाल तयार करण्याच्या प्रक्रियेला गती देण्याची आवश्यकता आहे.
त्याचबरोबर सध्या उपलब्ध असलेल्या वाहतूक पायाभूत सुविधांचा पूर्ण क्षमतेने वापर करून त्यांची क्षमता वाढविण्यासाठी महापालिका, पोलीस, रेल्वे, महामेट्रो, पीएमपीएमएल, एसटी आणि परिवहन विभाग यांची संयुक्त उपसमिती स्थापन करण्याचे निर्देश त्यांनी दिले. या उपसमितीने केलेल्या उपाययोजनांचे सादरीकरण पुढील बैठकीत करण्यासही सांगितले. मेट्रो आणि रेल्वेसारख्या सार्वजनिक वाहतूक सेवांचा प्रभावी वापर वाढविण्यासाठी ‘लास्ट माईल कनेक्टिव्हिटी’ सक्षम करणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यासाठी संबंधित ठिकाणी पीएमपीएमएल बस सेवा, रिक्षा थांबे आणि पूरक सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला.
महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी बोगद्यांचे नियोजन करताना केवळ खासगी वाहनांपुरते मर्यादित न ठेवता सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेलाही प्रवेश देण्यात यावा, अशी सूचना केली. त्यामुळे वाहतुकीचा वेग वाढण्यास मदत होईल, असे त्यांनी सांगितले. पीएमआरडीएचे आयुक्त अभिजीत चौधरी यांनी वाहतूक कोंडीच्या प्रमुख ठिकाणांना प्राधान्य देऊन प्रकल्पांची आखणी करण्याची गरज व्यक्त केली. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांसह संपूर्ण महानगर प्रदेशातील वाहतूक व्यवस्था एकात्मिक पद्धतीने गतिमान होण्यासाठी समन्वय आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी वाहतूक विभागाच्या उपाययोजनांबाबत सादरीकरण करताना विविध अंमलबजावणी यंत्रणांनी परस्परांमध्ये सांख्यिकी माहिती आणि डेटा सामायिक केल्यास वाहतूक कोंडीवर अधिक प्रभावीपणे उपाययोजना करता येतील, असे सांगितले. बैठकीत पुणे रेल्वे स्थानकाच्या विस्ताराबाबतही माहिती देण्यात आली. त्यानुसार, पुणे रेल्वे स्थानकावर नवीन सहा फलाट उभारण्याबरोबरच विद्यमान सहा फलाटांची लांबी वाढविण्यात येणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने सादरीकरणात नमूद केले.
यावेळी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, रेल्वे, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, पुणे महानगर परिवहन महामंडळ, महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, नगररचना विभाग, वाहतूक व परिवहन विभागाचे अधिकारी तसेच मोनार्च कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते.