संग्रहित फोटो
व्हायरल व्हिडिओमध्ये संबंधित शेतकरी पाण्याअभावी जळालेल्या उसाच्या नुकसानीबाबत पंचनामा करण्याची मागणी करताना दिसतो. यावेळी शेतकरी आपली व्यथा मांडत असताना कृषिमंत्री दत्तात्रय भरणे “माझ्याकडे काही नाही तुमचं… मी साधा माणूस आहे… गरीब माणूस आहे… तुम्ही मोठी माणसं आहात…” असे म्हणत शेतकऱ्याच्या बोलण्याची नक्कल करत असल्याचे दिसून येत आहे. यानंतर “तुम्ही मोठ्या माणसांचे ऐकून आंदोलन करता, ज्यांनी सांगितलं त्यांच्याकडे जा,” असेही ते म्हणाल्याचे व्हिडिओमध्ये ऐकू येते.
दरम्यान, शेतकरी “मामा, तुम्ही सिंचन भवनमध्ये आम्हाला शब्द दिला होता,” असे सांगत आश्वासनाची आठवण करून देतो. त्यावर “मी तुम्हाला शब्द दिला नाही,” असे उत्तर मंत्री भरणे देताना दिसतात. तसेच “तुमचा आणि माझा काही शब्द नाही,” असेही ते म्हणाल्याचे व्हिडिओमध्ये दिसून येते. त्यानंतर मंत्री भरणे वाहनात बसून तेथून निघून जातात.
विशेष म्हणजे, २५ मे रोजी खडकवासला कालव्याच्या पाण्यासाठी इंदापूर तालुक्यात शेतकऱ्यांनी आंदोलन केले होते. त्यावेळी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आंदोलक शेतकऱ्यांशी चर्चा करून लवकरच पाणी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिल्याचा दावा शेतकरी करत आहेत. मात्र, त्यानंतरही पाणी न मिळाल्याने काही शेतकऱ्यांच्या उसाचे नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे.






