‘वृक्ष गजानन’ची अनोखी संकल्पना (फोटो- सोशल मिडिया)
निसर्गप्रेम आणि पर्यावरणाबद्दलची काळजी यातून डॉ. अक्षय कौठाळे , केदार कुंभार, ऋत्वेश जाधव, चारुदत्त जाधव यांनी २०१९ मध्ये ‘वृक्ष गजानन’ उपक्रमाला सुरुवात केली. उरुळी कांचन येथील दत्तवाडी परिसरात या मूर्ती तयार केल्या जातात. सुरुवातीला केवळ ११ इंचाची एकच मूर्ती तयार करण्यात आली होती. त्यानंतर वेगवेगळ्या आकारांची आणि रचनांची मॉडेल्स विकसित करण्यात आली.
पुण्यापासून सुरू झालेला हा प्रवास आता महाराष्ट्राच्या पलीकडे पोहोचला आहे. नाशिक, अमरावती, जळगाव आणि धुळे येथे विक्री केंद्रे आणि वितरकांचे जाळे उभे राहिले आहे. दुबई, कॅनडा, जर्मनी आणि अमेरिकेतही या मूर्ती पाठविल्या जात आहेत. बंगळुरू, हैदराबाद, कारवार आणि बेळगाव येथून ऑनलाइन मागणीही होत आहे.
या मूर्तींचे वैशिष्ट्य म्हणजे शेतातील काळ्या मातीचा वापर. मातीव्यतिरिक्त कोणतेही रसायन वापरले जात नाही. मजबुतीसाठी नारळाच्या काथ्याचा वापर केला जातो. मूर्तीसोबत ज्यूटची पिशवी, मातीची कुंडी आणि बियाण्यांचे पाकीट दिले जाते. यंदा वांगी आणि मेथीच्या बियांचा समावेश आहे. त्यामुळे विसर्जनानंतर मूर्तीची माती कुंडीत घेऊन त्यात बिया पेरता येतात आणि त्यातून हिरवे रोप उगवते.
या उपक्रमाच्या उत्पादन प्रक्रियेत महिलांचाही मोठा सहभाग आहे. उरुळी कांचन येथील कारखान्यात महिला मूर्ती घडविण्याबरोबरच मुकुटावरील नक्षीकाम, डोळे आणि गंध रेखाटण्याचे काम करतात. व्यवसायाचा विस्तार होत असताना दरवर्षी सात ते आठ महिलांना रोजगार दिला जातो.
शाडूच्या मूर्तींपेक्षा या मूर्ती तयार करण्यासाठी अधिक वेळ आणि मेहनत लागत असली, तरी पर्यावरणपूरक पर्याय सर्वसामान्यांना परवडावा, यासाठी एक फुटाच्या मूर्तीची किंमत शाडूच्या मूर्तीच्या किमतीच्या आसपास ठेवण्यात आली आहे. नदीत विसर्जन करून उत्सव संपवण्याऐवजी, विसर्जनानंतरही बाप्पाला नव्या रूपात जपण्याचा संदेश ‘वृक्ष गजानन’ मधून दिला जात आहे.
– शेतमातीपासून तयार केलेली गणेशमूर्ती
– चंदेरी पाट
– शेतमातीने भरलेली कुंडी
– बियाण्यांचे पाकीट
– ज्यूटची पिशवी
– १०० टक्के पर्यावरणपूरक मूर्ती
– घरीच विसर्जनाची सुविधा
– जलप्रदूषणाला आळा घालण्यास मदत
– विसर्जनानंतर मूर्तीच्या मातीचा पुनर्वापर
– बाप्पाच्या मातीतून रोप उगविण्याची संधी
– वृक्षारोपणाच्या संकल्पनेला प्रोत्साहन
– प्लास्टिकऐवजी ज्यूटच्या पिशवीचा वापर
– पर्यावरणपूरक गणेशोत्सवासोबत महिलांना रोजगाराची संधी






